मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारामागे गॅगस्ट लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांचा सहभाग असल्याचे भक्कम पुरावे गुन्हे शाखेला सापडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांत बिष्णोई बंधूंना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. लॉरेन्स विविध गुन्ह्यांत गुजरातच्या साबरमती जेलमध्ये असल्याने त्याचा लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला असून त्याची या प्रकरणात चौकशी होणार आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध लवकरच लुक आऊट नोटीस बजाविण्यात येणार आहे. याच गुन्ह्यांत गुन्हे शाखेने तीन कलमांची वाढ केली आहे. त्यात ५०६ (२) जिवे मारण्याची धमकी देणे, ११५ मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपप्रेरण मात्र अपराध न घडल्यास, २०१ पुरावा नष्ट करणे आदींचा समावेश आहे. दुसरीकडे याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सलमान हा बॉलीवूड दबंग भाईजान असून त्याला यापूर्वीही बिष्णोई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. निनावी पत्रासह मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. या धमक्याकडे खान कुटुंबियांनी नेहमीच दुर्लक्ष केले होते. मात्र प्रत्येक धमकीनंतर त्यांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यामुळे बिष्णोई बंधूंसह अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र १४ एप्रिलला सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेटजवळ झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण बॉलीवूड हादरले. या गोळीबाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही शूटर विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल यांना गुजरातच्या भूज येथून अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांना लोकल कोर्टाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपी नियमित लॉरेन्स आणि अनमोलच्या संपर्कात होते. त्यांनी गोळीबारासाठी या दोघांची निवड करताना त्यांना आर्थिक मदत तसेच हत्यार पाठवून दिले होते. या कटात लॉरेन्स आणि अनमोलचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस आल्याने या गुन्ह्यांत बिष्णोाई बंधूंना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले.
या आरोपीविरुद्ध पोलिसांनी पूर्वी ३०७, ३४, १२० ब, भादवी सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता त्यात ५०६ (२), ११५, २०१ या तीन कलमांची वाढ करण्यात आली आहे असेही एका अधिकार्याने बोलताना सांगितले. गोळीबारानंतर अनमोलने गोळीबाराची जबाबदारी स्विकारताना सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल केली होती. या फेसबुक पोस्टचा आयपी ऍड्रेस पोर्तुगालमध्ये ट्रक झाला होता. विशेष म्हणजे गोळीबारापूर्वी तीन तासापूर्वीच अनमोलने ती पोस्ट व्हायरल केली हेती. इंटरनॅशनल मोबाईलचा वापर करुन अनमोलने बोगस अकाऊंट उघडले होते. या संपूर्ण कटात लॉरेन्स आणि अनमोलचा सहभाग स्पष्टपणे दिसून आल्याने लवकरच लॉरेन्सचा गुन्हे शाखेकडून ताबा घेतला आहे. त्यापूर्वी किल्ला कोर्टात रितसर अर्ज केला जाईल असेही या अधिकार्याने सांगितले.