सलमानच्या घराजवळ फायरिंगसाठी शस्त्रे पुरविणारे सापडले पंजाबमध्ये
दोघांचा ताबा घेऊन गुन्हे शाखेकडे; अटक आरोपींची संख्या चार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनंता सलमान खानच्या घराजवळ फायरिंगसाठी शस्त्रे पुरविणार्या दोन्ही आरोपींना पंजाबमधून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. अनुज थापन आणि सोनू सुभाष चंदर अशी या दोघांची नावे असून शस्त्रे दिल्यानंतर ते दोघेही पंजाबला पळून गेले होते. यातील अनुज हा अनमोल बिष्णोईचा खास सहकारी समजला जातो. अटकेनंतर या दोघांनाही रात्री उशिरा या दोघांनाही विमानाने पंजाबहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणणयत आले आणि नंतर त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. या वृत्ताला प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दुजोरा दिला आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
सलमान खान याच्या गोळीबार केल्यानंतर पळून गेलेल्या विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर राऊत पाल या दोघांनाही दोन दिवसांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी गुजरातच्या भूज शहरातून अटक केली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर ते दोघेही पोलीस कोठडीत होते. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत अनुजचे नाव समोर आले होते. सलमान खानच्या घरावर फायरिंगसाठी अनुजवर शस्त्रे पुरविण्याची जबाबदारी बिष्णोईने सोपविली होती. त्यामुळे अनुज हा सोनूसोबत १५ मार्चला पनवेलला सागरकुमार आणि विकीकुमार राहत असलेल्या भाड्याच्या रुममध्ये आला होता. तिथेच त्यांनी त्यांना गोळीबारासाठी दोन पिस्तूल, चार मॅगझीन आणि ४० जिवंत काडतुसे दिले होते. त्यानंतर ते दोघेही पुन्हा पंजाबला निघून गेले होते. बिष्णोईने त्यांना काही दिवस तिथेच लपवून राहण्यास सांगितले होते. दोन्ही आरोपींच्या चौकशीतून अनुजचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली होती. अनुज हा पंजाबमध्ये लपला असल्याची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या एका पथकाला तिथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने पंजाब पोलिसांच्या मदतीने अनुजसह सोनू या दोघांना अटक केली. रात्री उशिरा या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.
यातील सोनू शेतीसह किराणा दुकान चालवितो तर अनुज हा हेल्पर म्हणून काम करतो. अनुज हा अनमोल बिष्णोईचा थेट संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरुन त्याने शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध खंडणीसह घातक शस्त्रे बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्या अटकेने या कटातील आरोपींची संख्या चार झाली आहे. या दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.