सलमान खानसोबत इतर दोन अभिनेते होते हिटलिस्टवर
बिष्णोईच्या सहकार्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारानंतर शूटरच्या हिटलिस्टवर बॉलीवूडचे अन्य दोन अभिनेते असल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत राजस्थानातून अटक केलेला अनमोल आणि लॉरेन्स बिष्णोईचा खास सहकारी मोहम्मद रफिक चौधरी याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याने सलमानसह इतर अभिनेत्याच्या घराची रेकी करुन व्हिडीओ काढले होते. ते व्हिडीओ नंतर अनमोलला पाठविण्यात आले होते.
१४ एप्रिलला सलमान खान याच्या घराजवळ दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराची जबाबदारी विदेशात वास्तव्यास असलेल्या अनमोल बिष्णोई याने स्विकारली होती. सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल करुन त्याने त्याच्याच आदेशावरुन हा गोळीबार झाल्याची कबुली देताना सलमान खानला धमकीवजा इशारा दिला होता. या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकाने सुरतच्या भूज, पंजाब आणि राजस्थानातून पाच आरोपींना अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन, सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि मोहम्मद रफिक चौधरी याचा समावेश होता. यातील मोहम्मद रफिक हा सध्या पोलीस कोठडीत असून अनुजने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विकीकुमार, सागरकुमार आणि सोनूकुमार हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस तपासत मोहम्मद रफिक हा बिष्णोई टोळीचा खास सहकारी म्हणून परिचित आहे. चौकशीदरम्यान त्याने गोळीबार करणार्या दोन्ही शूटरला आर्थिक मदत तसेच लॉजिस्टिक मदत केल्याची कबुली दिली होती. त्यांच्यासोबत त्याने सलमानच्या वांद्रे येथील घरासह पनवेलच्या फार्महाऊसची रेकी केल्याची कबुली दिली होती. ही रेकी करताना त्याने त्याच्या घरासह फार्महाऊसचे व्हिडीओ काढले होते. तसेच तो शूटींगसाठी जात असलेल्या ठिकाणीही पाहणी केली होती.
सलमान खानसोबत बॉलीवूडचे इतर दोन अभिनेते या आरोपींच्या हिटलिस्टवर होते. त्यांच्या घराचेही त्यांनी रेकी करताना काही व्हिडीओ काढले होते. ते व्हिडीओ त्यांनी विदेशात वास्तव्यास असलेल्या अनमोल बिष्णोईला पाठविले होते. सलमानसह इतर दोन अभिनेत्यांच्या घराचे व्हिडीओ काढण्यासाठी त्यांना अनमोलनेच सांगितले होते. व्हिडीओ पाठविल्यानंतर त्यांनी सर्व डाटा डिलीट केला होता. ते डाटा पुन्हा मिळविण्यासाठी आता गुन्हे शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांचा मोबाईल फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. हा डाटा मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे मिळणार आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. अटक आरोपीपैकी चार आरोपी थेट अनमोलच्या संपर्कात नव्हते. मात्र मोहम्मद रफिक हा नियमित अनमोलच्या संपर्कात होता. त्याच्या आदेशाचे पालन करत होता. त्याच्या सूचना तो इतर सहकार्यांना देत होता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मोहम्मद रफिक अनमोलच्या संपर्कात राहून टोळीचे सूत्रे सांभाळत होता. त्यामुळे त्याच्या अटकेने अनमोलला प्रचंड हादरा बसल्याचे बोलले जाते.
अनेकदा ते दोघेही व्हाईस किंवा व्हिडीओ कॉलवर संभाषण करत होते. त्याच्या अटकेने बिष्णोई टोळी कुठल्या शहरात आणि किती सक्रिय आहे याची माहिती काढण्यास गुन्हे शाखेला मदत मिळत आहे. विकीकुमार आणि सागरकुमारच्या अटकेनंतर अनमोल हा पळून गेला होता. काही दिवस तो कोणाच्याही संपर्कात नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे मुंबई पोलिसांना आव्हान होते, अखेर त्याला राजस्थानातून गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.