पत्र-मेलवरुन जिवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानच्या घरासमोर गोळीबार
अज्ञात व्यक्तीकडून गोळीबाराने तणाव; गोळीबारामागे बिष्णोई टोळीवर संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – गेल्या काही वर्षांपासून निनावी पत्रासह मेलवरुन जिवे मारण्याची धमकी मिळत असलेल्या बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरासमोरच दोन अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबाराच्या वेळेस सलमान हा त्याच्या घरी होता, मात्र सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला दिले आहेत. मारेकर्यांच्या अटकेसाठी वीसहून अधिक विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास लवकरच गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे. या गोळीबारामागे बिष्णोई टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे.
सलमान खान हा बॉलीवूडचा दबंग अभिनेता असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेटमध्ये राहतो. रविवारी पहाटे पाच वाजता त्याच्या घराजवळ बाईकवरुन दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी हवेत चार ते पाच गोळी झाडल्या. गोळीबारानंतर ते दोघेही बाईकवरुन पळून गेले. गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रात्रपाळीवर चार सुरक्षारक्षक तैनात होते. या चारही सुरक्षारक्षकांची जबानी नोंदवून पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन दोन बाईकस्वार तेथून पळून जाताना दिसत आहे. या दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. तसेच लाईटमुळे बाईकचा क्रमांक प्राप्त होऊ शकले नाही. मारेकर्यांनी गुन्ह्यांत वापरलेल्या दोन बाईकपैकी एक बाईक नंतर पोलिसांनी जवळच्या परिसरातून ताब्यात घेतली आहे. मारेकर्यांना कोणालाही इजा करायची नव्हती, मात्र गोळीबार करुन त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. गोळीबारानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक टिमला बोलाविण्यात आले होते. तिथे पोलिसांना रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत काडतुस सापडले. काडतुस लोड करताना खाली पडले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबार कोणी केला याबाबत काहीही माहिती समजू शकली नाही.
गोळीबारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला तपास करण्याचे आदेश दिले होते. जवळपास वीसहून अधिक पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने गोळीबारानंतर पळून गेलेल्या मारेकर्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गोळीबारानंतर सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यात बिष्णोई टोळीने हा गोळीबार केल्याचा दावा केला आहे. या दाव्याची पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. सलमानला अनेकदा पत्रासह मेलवरुन विष्णोई टोळीकडून धमकी देण्यात आली होती. त्याच्या जिवाला धोका असल्याने त्याला राज्य शासनाने वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. मात्र सलमानच्या घरासमोर गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या घटनेची गृहविभागाने गंभीर दखल घेत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मारेकर्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहे. या गोळीबाराने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सलमानशी फोनवरुन चर्चा केल्याचे बोलले जाते.
सहा वर्षांपूर्वी बिष्णोई टोळीने सलमानवर हल्ला करण्यासाठी काही शूटर मुंबईत पाठविले होते. गायक सिद्धू मुसेवालासोबत जे झाले तेच सलमानसोबत होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १९९८ साली राजस्थान येथे सलमान खान हा हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटींगसाठी गेला होता. यावेळी त्याने एका काळवीटची शिकार केली होती. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र मानले जाते. त्यामुळे टोळीने सलमानला टार्गेट केले होते. गोळीबारानंतर पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लवकरच मारेकरी पकडले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे गोळीबारानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.