सलमान खान याच्या निवासस्थानी दोघांचा घुसण्याचा प्रयत्न
सलमानला भेटण्याचा प्रयत्नात दोघांना जेलची हवा खावी लागली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2025
मुंबई, – गेल्या दोन दिवसांत बॉलीवूडचा दबंग सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका मॉडेलसह छत्तीसगढच्या तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. बेकायदेशीरपणे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. जितेंद्रकुमार सिंग आणि ईशा छाब्रिया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सलमानचे फॅन आहेत. सलमानच्या भेटण्याचा प्रयत्नात या दोघांना आता जेलची हवा खावी लागली आहे.
सलमान खान हा गेल्या काही वर्षांपासून बिष्णोई टोळीच्या हिटलिस्टवर असून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेटसमोर बाईकवरुन आलेल्या दोन शूटरने अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नव्हता. मात्र गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या गोळीबारानंतर बिष्णोई टोळीशी संबंधित सात आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यांच्यावर नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर एका आरोपीने पोलीस कोठडीत असताना आत्महत्या केली होती. या गोळीबारानंतरही सलमानला सतत जिवे मारण्याची धमकी येत आहे.
गेल्या वर्षी ज्या दिवशी सलमानला धमकी आली होती, त्याच दिवशी चालू वर्षांत पुन्हा सलमानला धमकी आली होती. त्याच्या घरात घुसून बॉम्बने त्याला उडविण्याची अज्ञात व्यक्तीने वाहतूक पोलिसांच्या वरळी येथील मुख्यालयात दिली होती. या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेत सलमानला वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. सलमानची स्वतची खाजगी सुरक्षा असून या खाजगी सुरक्षेसोबत त्याला पोलीस संरक्षण दिले आहे. तसेच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही पोलिसांचा बंदोबस्त असतो. या अपार्टमेंटमध्ये कुठल्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाही. असे असताना बुधवारी सकाळी तिथे एक तरुण सकाळपासून संशयास्पदरीत्या फिरत होता. सायंकाळी याच तरुणाने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या तरुणाने नाव जितेंद्रकुमार सिंग असून त्याचे वय 23 आहे. तो मूळचा छत्तीसगढचा असून तो काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. ताब्यात घेतलेल्या जितेंद्रकुमारला नंतर वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना गुरुवारी अशाच प्रकारे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणार्या ईशा छाब्रिया या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ईशा ही मॉडेल असून खार परिसरात राहते. ताब्यात घेतल्यानंतर तिने तिला सलमाननेच बोलाविल्याचे सांगितले, मात्र सलमान तिला ओळखत नसल्याचे तपासात उघडकीस आले.
या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी सुरक्षा भेदून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशीत ते दोघेही सलमानचे फॅन आहे, मात्र लपूनछपून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्यामागे त्याचा काय उद्देश होता, त्यांना तसे करण्यास कोणी सांगितले की त्यांना तिथे कोणी पाठविले होते याचा पोलीस तपास करत आहेत.