मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ एप्रिल २०२४
मुंबई, – बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करुन गुजरातला पळून गेलेल्या दोन्ही हल्लेखोरांना भूज येथून अटक केल्यानंतर लोकल कोर्टाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल अशी या दोघांची नावे असून ते बिहारच्या चंपारणचे रहिवाशी आहे. ते दोघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रसिद्धी आणि दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
१४ एप्रिलला सकाळी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. या हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोर पळून गेले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना दया नायक, खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण थोरात व अन्य युनिटच्या अधिकार्यांनी संमातर तपास सुरु करुन भूज येथून विकीकुमार आणि सागरकुमार या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गोळीबार दहशत निर्माण करण्यासाठी केल्याचे उघडकीस आले होते. सध्या ते दोघेही गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच चौकशीत लॉरेन्स बिष्णोईचे नाव समोर आले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गुन्ह्यांतील पिस्तूल त्यांनी मुंबई-गुजरात प्रवासादरम्यान एका नदीत फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
२८ फेब्रुवारीला ते दोघेही बिहारहून मुंबईत आले होते. तेव्हापासून ते मुंबई आणि पनवेल येथे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्यांनी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसह पनवेलच्या फॉर्महाऊसची अनेकदा रेकी केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल येथे त्यांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी फ्लॅटमालकाला दहा हजार ऍडव्हान्स तर साडेतीन हजार रुपये भाडे म्हणून दिले होते. काही दिवसांनी त्यांनी २४ हजारामध्ये एक बाईक खरेदी केली होती. याच बाईकचा नंतर गुन्ह्यांसाठी वापर झाला होता. हा संपूर्ण व्यवहार कॅश स्वरुपात झाला होता. होळीसाठी ते दोघेही पुन्हा बिहारला गेले होते. १८ मार्च ते २८ मार्च या कालावधीत ते बिहारला होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले आणि पनवेलला गेले होते. सागर पाल हा दोन वर्षांपूर्वी हरियाणा येथे नोकरी करत होता. तिथेच तो बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. विकीकुमार हादेखील तिथे कामाला होता. ते दोघेही एकाच गावचे रहिवाशी असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांना कोणालाही इजा घडवून आणायची नव्हती. प्रसिद्धी आणि दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तसे आदेशच त्यांना देण्यात आले होते.
या दोघांनी कोणाच्या सांगण्यावरुन गोळीबार केला होता. गोळीबार करण्याामागे त्यांचा काय उद्देश होता. गोळीबारानंतर त्यांनी पिस्तूल फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते पिस्तूल हस्तगत करणे बाकी आहे. गोळीबारानंतर सोशल मिडीयावर गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी स्विकारण्यात आी होती. ते अकाऊंट विदेशातून ऑपरेट झाले होते. त्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. अटक दोन्ही आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने बिहारहून मुंबईत आले होते. त्यामुळे हा कट बिहारमध्ये शिजला होता का. त्याचा तपासासाठी मुंबई पोलिसांची एक टिम लवकरच बिहारला जाणार आहे. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी मुंबईतून गुजरातला पळून गेले होते. तिथेच जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता. तिथे त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याचा तपास बाकी असल्याने गुजरातला एक टिम जाणार आहे. या कटात मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे कोण सहकारी आहेत, त्यांना कोणी मदत केली याचा तपास सुरु आहे. गुन्ह्यांसाठी त्यांनी बाईक खरेदी केली होती. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत कोणी केली. ते दोघेही मुंबई आणि पनवेल येथे काही दिवसांपासून वास्तव्यास होते. या कालावधीत ते कोणाला भेटले, ते कोणाच्या संपर्कात होते. सलमान खान वगळता त्यांना इतर कोणावर हल्ला करायचा होता का. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दुसरीकडे आरोपीचे वकिल अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, कलम ३०७ या गुन्ह्यांत अजिबात लागू होत नाही. कारण कोणत्याही पिडीत व्यक्तीला, तक्रारकर्त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. त्यांना या प्रकरणात खोटे गुंतविण्यात आले आहे. त्यांनी कधीही घटनास्थळाला भेट दिली नाही असे सांगितले.
या दोघांच्या चौकशीत ते दोघेही बिष्णोई टोळीसाठी काम करत होते. या टोळीसाठी त्यांनी यापूर्वीही काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गोळीबारामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आले आहे. आरोपी मुंबईसह हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार आणि गुजरात येथे गेले होते. त्यामुळे या सर्व राज्यात मुंबई पोलीस तपासाकामी जाणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनमोल बिष्णोई याने पोस्ट करुन या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तो सध्या विदेशात राहत असून त्यानेच ही योजना अंमलात आणली होती का याचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सलमानला बिष्णोई टोळीकडून अनेकदा मेल आणि पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी आली होती.
गोळीबाराच्या घटनेनंतर एका शूटरला ओळखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात गुजरात पोलिसांनी त्यांनीच दोन्ही शूटरला अटक करुन त्यांचा ताबा गुन्हे शाखेला दिल्याचे सांगितले. काही वेळानंतर भूजच्या उपअधिक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देताना एक प्रेस रिलीज जारी केली होती. सकाळी ही प्रेस रिलीज सर्वच सोशल साईटवर प्रसिद्ध झाली होती. यावेळी वांद्रे पोलिसांनीही तपासात त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने सोमवारी एका शूटरची ओळख पटविल्याचा दावा केला. या शूटरची ओळख पटल्याने दोन्ही शूटरला पकडण्यात यश आल्याचे सांगितले. या दाव्यामुळे नवी मुंबई, दिल्ली विशेष पथक, गुजरात पोलिसांमध्ये श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाल्याचे बोलले जाते. यासंदर्भात विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यशाचे अनेक बाप असतात, अपयशाचे कोणीही नसते अशी टिप्पनी केली आहे.