सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न महागात पडला
हैद्राबादच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; चौकशीनंतर सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी हैद्रबादच्या एका तरुणाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत काहीही आक्षेपार्ह सापडले नाही, त्यामुळे त्याची चौकशीनंतर सुटका करण्यात आली. याच गुन्ह्यांत त्याची पुन्हा चौकशी होणार असून त्यासाठी त्याला लवकरच समन्स बजाविण्यात येणार आहे.
१४ एप्रिलला सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारामागे कुख्यात गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई याचा सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत नंतर पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सलमान खानला विशेष प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा पुरविली होती. संबंधित ग्रुपचे अधिकारी आणि कर्मचारी सतत सलमानसोबत असतात. मंगळवारी सलमान हा त्याच्या कारमधून मेहबूब स्टुडिओ येथून वांद्रे येथील घरी जात होता. यावेळी त्याच्या सुरक्षा ताफ्यात एका बाईकस्वार तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला या अधिकार्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र काही अंतर गेल्यानंतर तो बाईकस्वार पुन्हा सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन या अधिकार्यांनी वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या घटनेनंतर त्याच्यविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याची चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. तो मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून त्याचे नातेवाईक मुंबईत राहतात. त्यांना भेटण्यासाठी तो मुंबईत आला होता. बाईकवरुन जाताना त्याला कारमध्ये सलमान खान होता हे माहित नव्हते. त्यामुळे चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. त्याची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता असून त्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.