सिनेअभिनेता सलमान खानला आणखीन एक धमकीचा मॅसेज

बिष्णोईशी वाद मिटविण्यासाठी पाच कोटीची खंडणीची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयाद्वारे सिनेअभिनेता सलमान खान याला मिळणार्‍या धमकीचे सत्र सुरु असतानाच आता आणखीन एका धमकीची भर पडली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉटअप क्रमांकावर ही धमकी पाठविण्यात आली आहे. त्यात लॉरेन्स बिष्णोईसोबतचा वाद मिटवायचा असेल तर सलमानने पाच कोटी रुपये द्यावे, नाहीतर त्याचा बाबा सिद्धीकी करु. त्यापेक्षा त्याची अवस्था वाईट करु अशी धमकीवजा इशाराच या मॅसेजद्वारे सलमान खानला देण्यात आला आहे. या धमकीची गुन्हे शाखेकडून सत्यता पडताळून पाहिली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने बोलताना सांगितले. दरम्यान पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खान हा गेल्या काही महिन्यांपासून बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. त्याला यापूर्वीही अनेकदा पत्रासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोाई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर प्रत्येक वेळेस सलमानच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मे महिन्यांत सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नसला तरी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार झाला होता. याच गुन्ह्यांचा काही तासांत पोलिसांनी पर्दाफाश करुन गोळीबार करणार्‍या शूटरसह इतर आरोपींना अटक केली होती. आता या धमकीमध्ये आणखीन एका धमकीची भर पडली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचा एक व्हॉटअप क्रमांक आहे. गुरुवारी या व्हॉटअप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने सलमान खान याच्या नावाने एक धमकीचा मॅसेज पाठविला होता. त्यात सलमानला जिवंत राहायचे असेल, बिष्णोई टोळीशी सुरु असलेला वाद कायमचा मिटवायचा असेल तर बिष्णोई टोळीला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर त्याची अवस्था बाबा सिद्धीकीपेक्षा वाईट करु अशी धमकीच मॅसेजद्वारे देण्यात आली आहे. या धमकीची माहिती नंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या धमकीची सत्यता सध्या पडताळून पाहिली जात आहे.

ही धमकी बिष्णोई टोळीकडून देण्यात आली तर बिष्णोई टोळीच्या नावाचा वापर करुन कोणी दुसर्‍या व्यक्तीनेच तो मॅसेज पाठविला आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. सलमान आणि बाबा सिद्धीकी यांच्यात कौटुंबिक संबंध होते, त्यामुळे बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या जवळचे मित्र सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त व इतर अभिनेत्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच आता सलमानला पाच कोटीसाठी धमकी देण्यात आली आहे. पैसे दिले नाहीतर तुझाही बाबा सिद्धीकी करु किंवा त्यापेक्षा वाईट अवस्था करु अशी धमकी देण्यात आल्याने त्याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page