मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयाद्वारे सिनेअभिनेता सलमान खान याला बिष्णोई टोळीच्या नावाने पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी सेख होसेन सेख मौसीन या २४ वर्षांच्या तरुणाला वरळी पोलिसांनी अटक केली. लॉरेन्स बिष्णोईसोबत सुरु असलेला वाद मिटविण्यासाठी सेख होसेनने मॅसेजद्वारे सलमानने पाच कोटी रुपये द्यावे, नाहीतर त्याचा बाबा सिद्धीकी तसेच त्यापेक्षा त्याची अवस्था वाईट करु अशी धमकीवजा इशारा दिला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरळी पोलिसांच्या एका विशेष पथकाने झारखंडचा रहिवाशी असलेल्या सेख होसेन याला ताब्यात घेतले होते.
बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खान हा गेल्या काही महिन्यांपासून बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. त्याला यापूर्वीही अनेकदा पत्रासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोाई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर प्रत्येक वेळेस सलमानच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मे महिन्यांत सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नसला तरी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार झाला होता. याच गुन्ह्यांचा काही तासांत पोलिसांनी पर्दाफाश करुन गोळीबार करणार्या शूटरसह इतर आरोपींना अटक केली होती. या धमकीमध्ये आणखीन एका धमकीची भर पडली होती. १७ ऑक्टोंबरला मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या एका व्हॉटअप क्रमांकावर पोलिसांना एक मॅसेज प्राप्त झाला होता. मै लॉरेन्स बिष्णोई गँग से बात कर रहा हू, अभिनेता सलमान खान से बोलो मुझे पाच करोड रुपये देना.नही तो उसका हाल भी बाबा सिद्धीकी जैसा होगा असा इंग्रजीमध्ये टंकलिखित केलेला हिंदी मॅसेज पाठविण्यात आला होता.
या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांना गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ३५३ (२), ३०८ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सुतार, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ फुंदे, पोलीस हवालदार रुपीन पाटील, पोलीस शिपाई शरद चव्हाण, निलेश वाणी यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर प्राप्त केले होते.
तांत्रिक माहितीवरुन धमकीचा मॅसेज झारखंड येथून पाठविण्यात आले होते. त्यानंतर या पथकाने सेख हौसेन या तरुणाला झारखंडच्या जमशेदपूर येथून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर थट्टामस्करी म्हणून त्याने हा मॅसेज पाठविल्याचे तपासात उघडकीस आले. मात्र ही मस्करी त्याच्या चांगलीच अंगाशी आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.