मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – गेल्या वर्षी सांगलीतील एमडी ड्रग्ज कारखान्यांचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केल्यानंतर या कटातील एका मोस्ट वॉण्टेड आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुस्तफा मोहम्मद कुन्नावाला असे या आरोपीचे नाव असून तो दुबईत राहून या ड्रग्ज तस्करीचे सूत्रे हलवत होता. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजाविली होती. युईएमधून भारतात प्रत्यार्पण होताच त्याचा सीबीआयकडून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला ताबा देण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीमागील अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी अकराहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 252 कोटी 28 लाखांचा126 किलो 141 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 3 कोटी 64 लाख 15 हजाराची कॅश, 1 लाख 50 हजार 420 रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 लाखांची एक सफेद रंगाची स्कोडा कार, 50 हजाराची एक बाईक, ड्रग्ज बनविण्याचे साहित्य असा 256 कोटी 49 लाख 96 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
16 फेब्रुवारी 2024 रोजी कुर्ला येथे एक महिला एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने कुर्ला येथील चेंबूर-सांताक्रुज लिंक रोड, सयाजी पगारे चाळ, सीएसटी रोडवरुन पोलिसांनी परवीनबानो शेख या महिलेस अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी 641 ग्रॅम वजनाचे एमडी आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली 12 लाख 20 हजार रुपयांची कॅश, दिड लाखांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला होता. तिच्या चौकशीतून तिला ते ड्रग्ज मिरारोड येथे राहणार्या साजिद मोहम्मद शेख याने दिल्याचे तसेच एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला मिरारोड येथून साजिदला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख 68 हजाराची कॅश आणि सहा कोटीचे तीन किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी गुजरातच्या सुरत शहरातून इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा या दोघांना अटक केली. या सर्व आरोपींच्या चौकशीतून सांगली येथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एमडी ड्रग्ज बनविणार्या कारखान्यात कारवाई केली होती.
25 मार्च 2025 रोजी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कारखान्यातून 245 कोटी रुपयांचा 122 किलो 500 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच कारवाईत पोलिसांनी प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी, लक्ष्मण बाळू शिंदे यांना अटक केली होती. तपासात सहा महिन्यांपूर्वी मुस्तफा आणि ताहेर सलीम डोला यांनी सहा महिन्यांपूर्वी सांगली येथे ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यात बनविलेला एमडी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरात विक्री केला जात होता. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही ड्रग्जसहीत इतर गुन्ह्यांत अटकेची कारवाई झाली होती. जेलमध्ये असताना त्यांची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुन्हा एमडी ड्रग्जची विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याची योजना बनविली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगली येथे एक कारखाना सुरु केला होता. ही टोळी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी परवीनबानोचा वापर करत होती. महिलांवर शक्यतो कोणीही संशय घेत नसल्याने प्रत्येक डिलसाठी तिला पाठविले जात होते. त्यासाठी तिला चांगले कमिशन मिळत होते. अटकेनंतर संबंधित विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले असून याच गुन्ह्यांत सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
या गुन्ह्यांत मुस्तफा आणि ताहेरला या दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्यापैकी ताहेरला गेल्या महिन्यांत पोलिसांनी अटक केली होती तर मुस्तफा फरा होता. तो दुबईहून एमडी ड्रग्जचा कारखाना चालवून त्याच्या सहकार्यांमार्फत ड्रग्जची मुंबईसह इतर शहरात विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजाविली होती. त्याच्या अटकेसाठी केंद्रीय पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. ही मोहीम सुरु असताना मुस्तफा हा युईएमध्ये असल्याची माहिती प्राप्त होताच या अधिकार्यांनी त्याची माहिती संबंधित तपास यंत्रणेला दिली होती.
अटक केल्यानंतर त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याचा ताबा सीबीआय आणि नंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून या ड्रग्ज रॅकेटविषयी अनेक महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुस्तफा हा कोणासाठी काम करत होता. ड्रग्जची रक्कम त्याला हवालामार्फत पाठविली जात होती. या पैशांची त्याने कशा प्रकारे विल्हेवाट लावली, विदेशात कुठे कुठे गुंतवणुक केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, महेश शेलार, परबळकर, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार राऊत यांनी केली.