कामात अधिष्ठान निर्माण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा गौरव

0

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जे करील त्याचे
परमेश्वराचे तेथे
अधिष्ठान पाहिजे
समर्थ रामदास स्वामी यांचे हे वचन म्हणजे जीवनाचे सार. चळवळ म्हणजे हाती घेतलेले काम. हे काम करताना परमेश्वराचे अधिष्ठान असेल तर ते यशस्वी होतेच. आपण करत असलेल्या कामात आपल्याला काम मिळणार याची अपेक्षा न करता आपण ते परमेश्वराच्या पायी घातले तर यश फार लांब नसते. वाशी, न्हावाशेवा, रबाळे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी समर्थांचे हे वचन अगदी खरं करून दाखवले आहे. आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर ते देवाला अर्पण होते आणि असे काम यश मिळवून जाते, याची प्रचीती संजीव धुमाळ यांना आली. पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ७८ व्या स्वातंत्रदिनी गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पोलीस पदक संजीव धुमाळ यांना मिळाले. त्यांच्या आतापर्यंतच्या पोलीस दलातील कामाचा गौरव झाला. असा गौरव व्हावा ही मनात सुप्त इच्छा असली तरी काम प्रामाणिकपणे करत राहायचे, फळाची अपेक्षा करायची नाही या धुमाळ यांच्या सेवेतील बोधवाक्यामुळे आज त्यांचा हा गौरव होतोय.

ध्यास हिच यशाची पहिली पायरी
पोलीस खाते हे कमालीचे निरस खाते. सतत गुन्हेगारांशी संबंध येत असल्यामुळे या खात्यात काम करणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात तो गुण आपसूक येतो. पण त्यातही आपले स्वत्व जपून परमेश्वराशी तादम्य साधण्याची कला पोलीस दलात फार कमी लोकांना जमते. ती कला संजीव धुमाळ यांना चांगली जमलेली आहे. त्यामुळेच आज धुमाळसाहेब हे राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. संजीव धुमाळ यांनी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळाकाॅलेजपासून उराशी बाळगले होते. म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट मिळते. तसेच धुमाळ यांचे झाले. कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलात जाण्याचे हे स्वप्न होते. ते धुमाळ यांनी पाहिले नातेवाईक असलेले माजी पोलीस अधिकारी श्री शंकरराव महाडीक यांच्यात. त्यांचा आदर्श व डोळ्यासमोर ठेवुन 1991 मध्ये धुमाळ पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई पदावर दाखल झाले. त्यानंतर नोकरी सांभळुन सतत अभ्यास करुन MPSC मार्फतीने 1994-95 मध्ये माझी पोलीस उप निरीक्षक म्हणुन त्यांची निवड झाली. खरं म्हणजे सेल्स टॅक्स निरीक्षक म्हणुन देखील त्यांची निवड झाली होती. पण स्वप्न होते युनिफाॅर्म घालून जनसेवा करण्याचे. त्यामुळे लोकसेवेची भावना मनामध्ये ठेवुन पोलीस उपनिरीक्षक म्हणुन महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झाले. अशावेळी घराच्या माणसांचा पाठिंबा आवश्यक असतो. आई-वडील तसेच भाउ-बहीण यांनी संजीव धुमाळ यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले.पत्नी, दोन मुले पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच धुमाळसाहेब आपले लक्ष्य गाठू शकते.

कामगिरी आणि कर्तबगारी
पोलीस दलात उपनिरिक्षक पदावर रुजू झाल्यानंतर केवळ खुर्ची उबवण्यासाठी संजीव धुमाळ यांनी काम केले नाही. तर त्या कामातून आनंद मिळले तसेच जनसेवा होऊन आपल्या हुशारीचा कस लागेल, हे त्यांनी कायम पाहिले. १९९६ ते १९९९ दरम्यान धुमाळ सांताक्रुझ पोलीस ठाण्यात होते. त्यावेळी त्यांनी अनेक दर्जेदार कामगिरी पार पाडल्या. पण त्यातही उल्लेखनिय म्हणजे पवन बाग मर्डर केस. त्यावेळी एका केसमध्ये काही आरोपींनी एका वाॅचमनचा खून केला. तसेच त्याच्या मदतीला आलेल्या दोन पोलीसांचीही हत्या केली. जबरी चोरी करून ते आरोपी पळून गेले होते. अशा नराधम आरोपींना पकडणे एक मोठे आव्हान होते. त्यापेक्षा पोलीस दलावरच या केसमध्ये प्रश्नचिन्ह लागले होते. संपूर्ण राज्याचे लक्ष या केसकडे लागले होते. ही केस खूप गाजली होती. त्यावेळी धुमाळ यांनी त्या आरोपींना अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला होतो. मुंबई पोलीस आजही स्काॅटलंड यार्डची तुलना करतात हे धुमाळ यांनी दाखवून दिले होते. धुमाळ यांची ही कामगिरी लक्षात घेऊन 1999-2006 या वर्षात त्यांची गुन्हे शाखेत रवानगी करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट 9, मध्ये त्यांनी तब्बल ६ वर्षे काम केले. तेथे त्यांच्या कर्तृत्वाला अधिकच झळाळी आली. लिलावती हॅास्पिटलचे प्रसिध्द डॅाक्टर वसंत जयकर यांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती.एका डाॅक्टरची अशाप्रकारे हत्या होणे हे मुंबई पोलिसांना गुन्हेगारांनी दिलेले आव्हान होते. त्यापेक्षाही पोलिसांवर चारही बाजूने दबाव होता. पण धुमाळ यांनी या केसमध्येही चमकदार कारवाई केली. त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळे डॅाक्टर असोशिएशनकडुन गौरविण्यात त्यांना आले होते. ⁠खारमध्ये टायर मधुन तस्करी करुन आणलेला दाऊद इब्राहीम टोळीचा मोठा शस्त्र साठा हस्तगत करुन टोळीचे अनेक गुन्हेगार अटक केले. 2003 मध्ये बसमध्ये झालेले तसेच गेट वे ॲांफ इंडीया व झवेरी बाझार येथील बॅाम्ब स्फोट करुन अनेक निरापराधांचा बळी घेणाऱ्या आरोपींना अटक करण्यात संजीव धुमाळ यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

कामाची दखल
प्रामाणिकपणे काम करत रहण्याचे फळ धुमाळ यांना मिळाले. त्यांची खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. सन 2007 ते 2018 अशी तब्बल 12 वर्षे त्यांनी या खात्यात काम केले. जे काम असेल ते प्रामाणिकपणे करायचे. मागे हटायचे नाही, हा धुमाळ यांचा स्वभाव आहे. त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला हादरा दिली. अनेक प्रसिद्ध पोलीस अधिकाऱ्यांसारखेच धुमाळ यांनी १८ ते २० चकमकीमध्ये सहभागी होऊन अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवले. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळेच अनेक शुट आउट केसेस उघडकीस येऊन आरोपीं विरुध्द मोका कायद्यान्वये कारवाई झाली. त्यांना कोर्टामार्फत शिक्षा सुनावलेली गेली.अंडरवर्ल्डचे डाॅन बंटी पांडे, संतोष शेट्टी, सुरेश पुजारी व रवी पुजारी यांना परदेशातुन भारतामध्ये आणुन कारवाई करण्यात धुमाळसाहेब सहभागी होते. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळेच त्यांना सन 2014 मध्ये Prestigious DG Insignia देवुन गौरविण्यात आले.

आदर्श यशाचे द्योतक
कोणतेही काम अधिष्ठानाने केले तर ते अधिक चांगले होते. त्यासाठी आदर्श डोळ्यापुढे असावे लागतात. असे आदर्श असतील तर व्यक्तीमध्ये आपोआपच निकोप स्पर्धा निर्माण होते. आपणही आपल्या आदर्शासारखे व्हावे, असे वाटणे हे भविष्यातील यशाचे द्योतक असते. धुमाळसाहेबांबाबतही तसेच झाले. पोलीस दलात काम करत असताना त्यांच्यापुढे आदर्श होते. शिवानंदन साहेब, राकेश मारीया साहेब, संजयकुमार साहेब, सदानंद दाते साहेब, संजय सक्सेना साहेब, देवेन भारती साहेब, मिलिंद भारंबे साहेब, प्रसन्ना साहेब व इतर वरीष्ठ अधिकारी अशी दिग्गज माणसे. इतकेच नाही तर माजी पोलीस अधिकारी श्री शंकरराव महाडीक, फतेसिंग गायकवाड, विलास तुपे, प्रदीप काळे, शहीद विजय साळसकर साहेब यांचे धुमाळ यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच आपण आतापर्यंत हा मोठा टप्पा गाठू शकलो, असे संजीव धुमाळ प्रामाणिकपणे सांगतात.

असे अधिकारी सर्वत्र हवेत
राष्ट्रपती पुरस्कार हा उल्लेखनिय कामाचा सन्मान असला तरी पोलीस दलातील कारकिर्दीतील तो एक मोठा टप्पा आहे. तो टप्पा संजीव धुमाळ यांनी आज पार केला आहे. पण मला खात्री आहे की धुमाळ यांनी राष्ट्रपती पुरस्कार मिळावा म्हणून काम केलेले नाही. तसे काम त्यांनी केले असते तर कदाचित त्यात अहंमपणा, स्वार्थाचा लवलेश येऊन ते सफल झाले नसते. पण अधिष्ठान समजून ते कार्यरत राहिले त्यामुळेच आज त्यांना हे यश मिळाले आहे. अशी अधिष्ठाने संजीव धुमाळ यांच्यासारखे अधिकारी जागोजागी निर्माण करतील तर प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुसह्य आणि सुरक्षित नक्कीच होईल. संजीव धुमाळ यांनी त्यासाठी दिलेल्या या आदर्श योगदानाबद्दल त्यांचे आभार आणि पुढील कारकि‍र्दीसाठी त्यांना मुंबई पोलीस टाईम्सकडून खूप खूप शुभेच्छा.

आबा माळकर

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page