मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – सोसायटीच्या वादातून दाद मागण्यासाठी म्हाडा कार्यालयात आलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकारी विजय चाळके यांना डांबून मारहाण केल्याप्रकरणी म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह इतर बाराजणांविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे म्हाडाच्या एका महिलेसह इतर अधिकार्यांनी विजय चाळके यांनीच त्यांच्याशी गैरवर्तन करुन मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही घटनेची खेरवाडी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर दोषीवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजय चाळके हे अंधेरीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असून ही सोसायटी पुर्नविकासासाठी गेली होती. गेल्या वर्षी सोसायटीच्या रहिवाशांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा मिळाला होता. मात्र आठ ते दहा रहिवाशांचा संबंधित बिल्डरसोबत वाद सुरु होता. हा वाद नंतर कोर्टासह म्हाडामध्ये दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर म्हाडाने आपला निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय संबंधित रहिवाशांना मान्य नव्हता. २६ डिसेंबरला या निर्णयाच्या विरोधात विजय चाळके यांच्यासह इतर रहिवाशांनी म्हाडा कार्यालयात जाऊन उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता.
या भेटीदरम्यान तेथील कर्मचार्यांशी त्यांचे शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यात त्यांनी संजीव जयस्वालसह त्यांच्या महिला आणि इतर कर्मचार्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांत तक्रार केली ाहेती. या तक्रारीनंतर त्यांनी या आरोपाचे खंडन करुन त्यांनीच त्यांना कार्यालयात डांबून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्यांनी संजीव जयस्वालसह इतर बाराजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सर्वांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत खेरवाडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. तसेच दोषीवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.