आर्थिक वादातून मित्राला मित्राने बाटलीने भोसकले
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी मित्राला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – आर्थिक वादातून मित्राला मित्राने दारुच्या बाटलीने भोसकल्याची घटना रविवारी सायंकाळी सांताक्रुज परिसरात घडली. या हल्ल्यात सुनिल गंगा चौधरी हा 41 वर्षांचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच आरोपी रिक्षाचालक मित्र शंकर कुमार राममुद्रजा याला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता सांताक्रुज येथील लिकिंग रोड, रेहजा इमारतीजवळ घडली. सुनिल हा वांद्रे येथील निर्मलनगर, यशवंतनगरच्या बोहरा चाळीत राहत असून चालक म्हणून काम करतो. रविवारी सायंकाळी सुनिल हा त्याचा मित्र रामकिशोर, केशवकुमार आणि नथनी ऊर्फ विनोद यांच्यासोबत रिक्षात मद्यप्राशन करत होते. यावेळी तिथे शंकर आला होता. यावेळी त्याने त्याच्याकडे उसने घेतलेल्या पैशांविषयी विचारणा केली होती. याच कारणावरुन सुनिल आणि शंकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात शंकरने तुझे पैसे देणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर असे बोलून पुन्हा पैसे मागितले तर तुझा गेमच करु टाकेन अशी धमकी दिली होती. त्याचा राग आल्याने सुनिलने त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती.
यावेळी शंकरने दारुच्या बाटलीने त्याच्या डोक्यावर आणि दंडावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सुनिल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुनिल चौधरीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शंकरविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शंकरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.