मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – हॉंगकॉंग येथे थंडी असल्याने मुंबईत आलेल्या एका वयोवृद्धाची तोतया सीबीआय अधिकार्याने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. मनी लॉड्रिंगसह ह्युमन ट्राफिकिंगप्रकरणी गुन्हा दाखल करुन हाऊस अरेस्ट केल्याची बतावणी करुन ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात तोतया सीबीआय अधिकार्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
८१ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथील एस. व्ही रोडवरील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत असून ते एका खाजगी कंपनीत निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा हॉंगकॉग येथे वास्तव्यास असून तो तिथेच नोकरी करतो. अनेकदा ते त्याच्या मुलांसोबत तिथे राहतात. मात्र हॉंगकॉंगमध्ये प्रचंड थंडी असल्याने ते काही दिवसांपूर्वीच भारतात परत आले होते. तेव्हापासून ते त्यांच्या सांताक्रुज येथील घरी एकटे राहत होते. त्यांचा मुलगा त्यांना खर्चासाठी पेसे पाठवत होता. तसेच त्यांनी काही पैसे बचत केली होती. सोमवार ९ डिसेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. या व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांचा मनी लॉड्रिंगसह ह्युमन ट्राफिकिंगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले आहे. दोन तासांनी त्यांचा मोबाईल बंद होणार आहे.
हाऊस अरेस्ट असल्याने त्यांना मोबाईलवर कोणाशी संपर्क साधता येणार नाही. त्यांनी तसे केल्यास त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली जाईल अशी भीती दाखविली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि अटकेच्या भीतीने त्यांनी कोणालाही संपर्क साधला नाही. काही वेळानंतर संबंधित तोतया सीबीआय अधिकार्यांनी त्यांना पुन्हा संपर्क साधून त्यांना एक बँक खात्याची माहिती दिली होती. या बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर करा असे सांगितले. त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांनी संबंधित बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कॉल बंद येत होता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून तोतया सीबीआय अधिकार्यविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत सांताक्रुज पोलिसांसह स्थानिक सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.