एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तीन बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
बोगस प्लॅनसह अनधिकृत बांधकामासाठी सातजणांना आर्थिक दंड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – बोगस प्लॅन सादर करुन मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्यामुळे कार्यालयासाठी जागा खरेदी करण्यास प्रवृत्त केलेल्या सातजणांची सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी बांधकाम कंपनीशी संबंधित तीन बिल्डरविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेन शेठ, मिलन शेठ आणि हिरेन शेठ अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांमुळे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये कार्यालयासाठी जागा घेतलेल्या सातजणांना मनपाला दंडाची रक्कम भरावी लागल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
चित्रांग तुषार मोतीवाला हे व्यावसायिक असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनीत आहे. सांताक्रुज येथे ते त्यांच्या आई-वडिल, पत्नी आणि मुलीसोबत राहतात. त्यांचे वडिल तुषार मोतीवाला हे डॉक्टर असून अंधेरीतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात. त्यांच्या वडिलांचे आदित्य मित्रा आनंद हे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांना त्यांच्या कार्यालयासाठी एका जागेची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुुरु होते. याच दरम्यान एका ब्रोकरमार्फत त्यांची मिलन, हिरेन आणि हितेश यांच्याशी ओळख झाली होती.
त्यांची एम एल बिल्डर नावाची एक फर्म असून या फर्मतर्फे सांताक्रुज येथील एस. व्ही रोडवर सुंदरव्हिला नावाच्या एका प्रोजेक्टचे काम सुरु होते. याच ठिकाणी त्यांनी एक व्यावसायिक गाला त्यांच्या कार्यालयासाठी बुक केला होता. तेव्हापासून त्यांचे शेठ कुटुबियांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. या प्रोजेक्टमध्ये त्यांना कमी किंमतीत कार्यालय देण्याचे आश्वासन देत त्यांन त्यांना प्रोजेक्टच्या मंजुरी प्लॅनचे दस्तावेज दाखविले होते. त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी तिथे एक कार्यालय घेतले होते. त्यासाठी त्यांना शेठ कुटुबियांना सोळा लाखांचे पेमेंट केले होते.
जुलै 2013 साली त्यांना मनपाकडून एक नोटीस प्राप्त झाली होती. त्यात हा प्रोजेक्ट प्लॅननुसार नसून त्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. करार करताना शेठ कुटुंबियांनी बोगस प्लॅन साद करुन त्यांना तिथे कार्यालय खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते. याच प्रोजेक्टमध्ये त्यांच्यासह इतर सहाजणांना जागा घेण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. अशा प्रकारे त्यांच्यासह इतर सहाजणांना शेठ यांच्या एम. एल बिल्डरकडून खरेदी करण्यात आलेल्या जागा नियमित करण्यासाठी मनपाला 1 कोटी 7 लाख 72 हजार रुपयांचे पेमेंट करावे लागले होते. त्यांनी बोगस प्लॅन मंजुर करुन अनधिकृत बांधकाम केल्यामुळे या सातजणांना अतिरिक्त पेमेंट करावे लागेल, त्यातून त्यांची या तिघांनी आर्थिक फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच डॉ. तुषार मोतीवाला यांच्या वतीने त्यांचा व्यावसायिक मुलगा चित्रांग मोतीवाला यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हितेन शेठ, मिलन शेठ आणि हिरेन शेठ या तिघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन सातजणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.