कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला ११ कोटीच्या खंडणीसाठी धमकी
दोन कोटी कॅश, चार कोटी डॉलर, आठ किलो सोन्याची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – सांताक्रुज परिसरातील एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला दोन अज्ञात व्यक्तींनी अकरा कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी स्वरुपात त्यांच्याकडे दोन कोटीची कॅश, चार कोटी डॉलर आणि सात ते आठ किलो सोन्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी खंडणीसाठी धमकाविणार्या दोन्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक शोध घेत आहेत.
४७ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथे राहतात. शुक्रवारी ३ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता ते त्यांच्या घरात कामात व्यस्त होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला होता. समोरील व्यक्तीने त्याचे नाव मनजीत असल्याचे सांगून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. तुझा आणि तुझ्या कुटुंबियांचा लवकरच गेम करणार असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडे अकरा कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. ही खंडणी त्यांना वेगवेगळ्या स्वरुपात देण्यास सांगण्यात आले होते. आधी दोन कोटी रुपयांची कॅश, नंतर चार कोटीचे डॉलर आणि शेवटची सात ते आठ किलो सोने द्यावे लागेल. पैसे दिले नाहीतर परिणामाला तयार रहा असे बोलून त्याने कॉल बंद केला होता.
सुरुवातीला त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. त्यानंतर त्यांना दुसर्या मोबाईलवरुन पुन्हा खंडणीसाठी धमकी आली होती. या व्यक्तीनेही त्यांच्याकडे भारतीय चलनासह डॉलर आणि सोन्याची मागणी केली होती. या घटनेनंतर त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दोन्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली आहे, त्या क्रमाकांची माहिती काढली जात आहे. धमकी देणार्या व्यक्तींवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा संमातर तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत.