मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सांताक्रुज येथे राहणार्या एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात सांताक्रुज पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर हत्यचेा पुरावा नष्ट करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस बिहारहून पोलिसांनी अटक केली. महेश्वरी मुखिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने मंगळवार १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र अंधारात चालताना सतत ओरडत असल्याने महेश्वरने त्याची हत्या करुन नंतर त्याचा हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अटकेच्या भीतीने तो त्याच्या बिहार येथील गावी पळून गेला होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
मृत नऊ वर्षांचा मुलगा त्याच्या आई-वडिल, दोन बहिणी व एका भावासोबत राहतो. त्याच्या आईचे निधन झाले असून तो त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता तर त्याचे वडिल रिक्षाचालक आहे. ७ नोव्हेंबरला तो छट पूजा असल्याने तो त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथील चौपाटीवर गेला होता. रात्री उशिरा ते सर्वजण घरी आले, मात्र हा मुलगा घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या वडिलासह स्थानिक रहिवाशांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिेले होते. ही शोधमोहीम सुरु असताना ११ नोव्हेंबरला सााताक्रुज येथील एका दुकानाजवळ दुर्गंधी येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमकडून सांताक्रुज पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. तिथे पोलिसांना मिसिंग मुलाचा मृतदेह सापडला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे, रणजीत आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, सुयोग अमृतकर,पोलीस उपनिरीक्षक धनंजय आव्हाड, शशिकांत हिंगवले, हिरेमठ, गावडे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर मृत मुलगा महेश्वरीसोबत दिसला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरुवात केली.
तपासात महेश्वरी हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो सहा वर्षांपूर्वी बिहारहून मुंबईत नोकरीसाठी आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो सांताक्रुज येथील कपड्याच्या कारखान्यात कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या गावी गेल्याचे समजले होते. त्यानंतर सांताकु्रुज पोलिसांची एक टिम बिहारला पाठविण्यात आली होती. या पथकाने तिथे दोन दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने महेश्वरीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. हत्येच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्येच्या दिवशी मृत मुलगा महेश्वरीसोबत येत होता. अंधारात चालताना त्याला भीती वाटत होती, तो सतत ओरडत होता. त्याचा राग आल्याने त्याने त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह दुकानाच्या छतावर टाकून तो कारखान्यात आला. मालकाला सांगून तो त्याच्या गावी पळून गेला. या हत्येमागे नक्की काय कारण आहे, मृत मुलगा अंधारात का ओरडत होता. तो त्याला अंधारातून कुठे आणि का नेत होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.