जुहू चौपाटी समुद्रात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीचा हत्येचा पर्दाफाश

मृतदेहाची ओळख पटली तर हत्येप्रकरणी कापड व्यापार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सोमवारी सकाळी जुहू चौपाटीजवळील लॅण्डींग पॉईट समुद्रात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात सांताकुज पोलिसांना यश आले आहे. मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव अशोक हरिलाल गौड (40) असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच वाहिदअली मोहम्मद इसराईल शेख ऊर्फ मिट्टू या 30 वर्षांच्या कापड व्यापार्‍याला पोलिसांनी अटक केली. वाहिदअलीचे मृत अशोक गौडच्या पत्नीशी कथित अनैतिक संंबंधावरुन ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत तिचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. अशोक गौड याची ओळख त्याच्या बोटातील अंगठीवरुन झाली आणि अवघ्या बारा तासांत पोलिसांनी त्याच्या हत्येचा पर्दाफाश करुन आरोपीस अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी सकाळी साांतक्रुज येथील जुहू चौपाटी, लॅण्डींग पॉईंट समुद्राजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत होता. गस्त घालताना पोलीस पथकाला एका प्लास्टिक गोणीमध्ये पुरुष जातीचे मृतदेह डोक्यापासून ते कमरेपर्यंत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या तसेच त्याचे शरीराचे दोन तुकडे करण्यात आले होते. या व्यक्तीची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा मारेकर्‍यांनी प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत संबंधित वयोगटातील कोणीही व्यक्ती मिसिंग आहे का याचा पोलीस तपास करत होते.

याच दरम्यान दहा दिवसांपूर्वी अशोक गौड नावाचा एक व्यक्तीचा मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मालवणी पोलीस ठाण्यात केली होती. या माहितीनंतर त्याच्या पत्नीला कूपर हॉस्पिटलमध्ये संबंधित व्यक्तीचा मृतदेह दाखविण्यात आला होता. मृतदेहाच्या अंगठीवरुन तिने तो मृतदेह तिच्या पतीचा असल्याचे सांगितले होते. त्यातून मृतदेहाचे नाव अशोक गौड असल्याचे उघडकीस आले होते. अशोक हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. वाहिदअली हा शेख हा त्याचा मालक असून तो त्याच्याच मालवणीतील कपड्याच्या युनिटमध्ये कामाला होता.

वाहिदअली हा मूळचा उत्तरप्रदेशच्या आझमगढचा रहिवाशी असून सध्या घाटकोपर येथील अहमदी मशिदीजवळील गैबनसा दर्गा रोड, नारायण नगरात राहतो. अशोकच्या पत्नीचे वाहिदअलीसोबत कथित अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती अलीकडेच अशोकला समजली होती. त्यातून त्याचे वाहिदअलीशी कडाक्याचे भांडण झाले होते. याच भांडणातून त्याने त्याच्या हत्येची योजना बनविली होती. दहा दिवसांपूर्वी त्याने अशोकला पैशांच्या बहाण्याने कपड्याच्या युनिटमध्ये बोलाविले होते. तिथेच त्याने शीतपेयातून त्याला गुंगीचे औषध दिले होते. ते शीतपेय प्यायल्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याने त्याची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले होते.

ते दोन्ही तुकडे प्लास्टिकच्या गोणीमध्ये टाकून त्याने जवळच असलेल्या नाल्यात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही गोणी वाहत जुहू चौपाटीवर आली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच वाहिदला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच अशोकची हत्या करुन त्याच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सखाराम मोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग अमृतकर, भूषण मोरे, विजय खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक समीर बोडके, स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार केणी, पोलीस शिपाई गावडे, यादव, चिला, सावकारे, सुरवसे, महिला पोलीस शिपाई भोसले, गुंजवटे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page