मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरुन राजेंद्र ऊर्फ राजू दास या 30 वर्षांच्या तरुणावर दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजू हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन आरोपी बंधूंना गुजरात येथून सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अर्जुनकुमार मणिलाल कोळी आणि मेहुल मणिलाल कोळी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी 1 एप्रिलला सकाळी पावणेनऊ वाजता सांताक्रुज येथील खोतवाडी, शिवसेना शाखेजवळील फिरोजशहा मेहता रोड, केदारनाथ मिश्रा चाळीतील शिवम स्टोअर्समध्ये घडली. याच परिसरातील भुपेंद्र मेन्शनमध्ये महादेव पाचाभाई पटेल हे वयोवृद्ध व्यापारी राहत असून त्यांच्या मालकीचे शिवम स्टोअर्स नावाचे एक दुकान आहे. याच दुकानात राजू हा कामाला होता. मंगळवारी तो दुकानात काम करत होता. यावेळी तिथे दोन तरुण आले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांनी राजूवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या पोटाला, खांद्याला, डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
रक्तबंबाळ झालेल्या राजूला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे. या हल्ल्यामागे अर्जुनकुमार आणि मेहुल कोळी या दोन बंधूंचा सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही याच परिसरात राहत असून अर्जुनकुमारच्या पत्नीची राजूने छेड काढल्याचा त्याला संशय होता. त्यातून त्याला धडा शिकवण्यासाठी अर्जुनकुमारने त्याचा भाऊ मेहुल याच्या मदतीने राजूवर चाकूने हल्ला केला होता.
या हल्ल्यानंतर ते दोघेही बंधूं पळून गेले होते. ते दोघेही गुजरातला लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मेहुलकुमार आणि मेहुल या दोघांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.