जुहू चौपाटीवर मद्यप्राशन करुन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहाजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – सांताक्रुज येथील जुहू चौपार्टी रेतीवर रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन करुन धिंगाणा घालून गस्त घालणार्या पोलिसांशी असभ्य वर्तन करुन हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी सहाजणांविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात तीन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे. स्नेहा शिवाजी शिंदे, खुशी शिवाजी शिंदे, सिमा शिवाजी शिंदे, दत्तात्रय उत्तम बक्के, श्रावण तुकाराम कांबळे, आदित्य अशोक बागुल अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना भारतीय न्याय सहिता कलमांच्या 35 (3) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
37 वर्षांच्या तक्रारदार या वरळीतील बीडीडी चाळीत राहत राहत असून सांताक्रुज पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी रात्री उशिरा त्या त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. मध्यरात्री साडेतीन वाजता सांताक्रुज येथील जूहू चौपाटी रेतीवर काहीजण मद्यप्राश करुन धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर तिथे पोलीस पथक गेले होते. यावेळी तिथे पोलिसांना तीन महिला आणि तीन पुरुष मद्यप्राशन करुन गोंधळ घालत होते. त्यामुळे या सर्वांना गोंधळ घालणे बंद करा, घरी निघून जाण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती.
तक्रारदार महिला शिपायाशी असभ्य वर्तन करुन शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करुन या सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी तक्रारदार शिपायाच्या तक्रारीवरुन सहाही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गस्त घालणार्या पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, असभ्य वर्तन करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.