मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सांताक्रुज येथे राहणार्या एका वयोवृद्धाच्या घरी कामाच्या दहाव्या दिवशीच सुमारे सव्वादहा लाखांच्या मुद्देमाावर हातसफाई करुन पळून गेलेल्या नोकराला अखेर सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. सुभाषकुमार दिलीपकुमार सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नोकराला काही तासांत पोलिसांनी शिताफीने अटक केली.
रवी महावीर प्रकाश हे 73 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशच्या मेरठचे रहिवाशी आहे. सध्या ते त्यांच्या पत्नीसोबत सांताक्रुज येथील रिलीफ रोड, आर्टिझा इमारतीमध्ये राहतात. वयोवृद्ध असल्याने त्यांनी त्यांचा मित्र मधु अरोरा यांच्यामार्फत प्रोकेअर हेल्थ अॅडव्हायझर्स कंपनीकडून सुभाषकुमार याला घरगडी म्हणून कामावर ठेवले होते. रविवारी 8 फेब्रुवारी 2026 पासून तो त्यांच्याकडे कामावर हजर झाला होता. सोमवारी 16 फेब्रुवारीला रात्री उशिरा ते दोघेही जेवण करुन झोपले होते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ते झोपेतून उठले, यावेळी त्यांना घरात सुशाषकुमार कुठेच दिसला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी रुमची पाहणी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या बॅगेतून त्यांचा मोबाईल, बँकेचे डेबीट, क्रेडिट कार्ड, चार हजाराची कॅश आणि क्रेडिट कार्डवरुन 9 लाख 90 हजार रुपये काढल्याचे दिसून आले. सुमारे सव्वादहा लाखांचा मुद्देमालाची चोरी करुन सुशाषकुमार हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुशाशकुमार सिंह याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या सुभाषकुमार काही तासांत अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल आणि कॅश हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.