प्रेयसीसोबतच्या भांडणानंतर प्रियकराचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर प्रियकराने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोलीस ठाण्यातील शासकीय प्रिंटरचे नुकसान करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकर गौरव रविंद्र सिंग याच्याविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाचच्या सुमारास सांताक्रुज पोलीस ठाण्यात घडली.

गौरव सिंग हा कुलाबा येथील लाला निंगम रोड, कुलाबा मार्केटच्या सुंदरनगर परिसरात राहतो. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी त्याचे त्याचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात प्रेयसी सांताक्रुज पोलीस ठाण्यात आली होती. तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगून गौरव सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरवविरुद्ध कारवाई सुरु केली होती. याच दरम्यान तिथे आलेल्या गौरवने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस शिपाई कडाळे यांना शिवीगाळ करुन त्याने त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षातील लॅक्समार्क कंपनीचा शासकीय प्रिंटरला धक्का देऊन प्रिंटर खाली पाडला होता. त्यामुळे प्रिंटरचे नुकसान झाले होते. वारंवार समजूत घालूनही त्याने पोलिसांशी उद्धट वर्तन करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झोल होते.

या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक शरद लांडगे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गौरव सिंग याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांना शिवीगाळ करुन अंगावर धावून जाणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page