मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कामाच्या दहाव्या दिवशीच नोकराने एका वयोवृद्धाच्या घरी हातसफाई केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुभाशकुमार सिंह या 28 वर्षांच्या नोकराविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. घरातील मोबाईल, डेबीट-के्रडिट कार्ड, कॅश आणि क्रेडिट कार्डवरुन त्याने 9 लाख 90 हजार रुपये काढून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रवी महावीर प्रकाश हे 73 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशच्या मेरठचे रहिवाशी आहे. सध्या ते त्यांच्या पत्नीसोबत सांताक्रुज येथील रिलीफ रोड, आर्टिझा इमारतीमध्ये राहतात. वयोवृद्ध असल्याने त्यांनी त्यांचा मित्र मधु अरोरा यांच्यामार्फत प्रोकेअर हेल्थ अॅडव्हायझर्स कंपनीकडून सुभाशकुमार याला घरगडी म्हणून कामावर ठेवले होते. रविवारी 8 फेब्रुवारी 2026 पासून तो त्यांच्याकडे कामावर हजर झाला होता. सोमवारी 16 फेब्रुवारीला रात्री उशिरा ते दोघेही जेवण करुन झोपले होते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ते झोपेतून उठले, यावेळी त्यांना घरात सुशाशकुमार कुठेच दिसला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी रुमची पाहणी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या बॅगेतून त्यांचा मोबाईल, बँकेचे डेबीट, क्रेडिट कार्ड, चार हजाराची कॅश आणि क्रेडिट कार्डवरुन 9 लाख 90 हजार रुपये काढल्याचे दिसून आले. सुमारे सव्वादहा लाखांचा मुद्देमालाची चोरी करुन सुशाशकुमार हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुशाशकुमार सिंह याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होता.