मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – अंधेरीतील चार बंगला, म्हाडा परिसरात असलेल्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्या बंगलोमध्ये प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल सदाशिव मुदाने या संशयिताला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या संशयिताला सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली होती. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
आफ्ताब अस्लम खान हे प्रॉपटी डेक केअर म्हणून काम करत असून सध्या अंधेरीतील लिंक रोडच्या ओबेरॉय स्प्रिंग्ज अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांपासून ते सिनेनिर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्याकडे कामाला आहेत. त्यांच्या मालकीचे अंधेरीतील चार बंगला, म्हाडामध्ये एक बंगला असून या बंगल्यात चित्रपटाच्या शूटींगचे सामान ठेवले होते. तिथेच आफ्ताब खान हे केअर टेकर म्हणून कामाला आहेत. तिथे कोणीही राहत नसल्याने ते स्वत आठ ते दहा दिवसांत जाऊन सामानाची पाहणी करण्याचे काम करत होते. २८ डिसेंबरला दुपारी तीन वाजता साजिद नाडियाडवाला यांच्या बंगलो क्रमांक १९२ मध्ये गेले होते. सर्व सामानाची पाहणी केल्यांनतर ते बंगलो बंद करुन निघून गेले होते.
८ जानेवारीला ते कामानिमित्त तिथे गेले होते. यावेळी त्यांना बंगलोजच्या मुख्य दरवाज्याचे टाळे तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन सर्व सामानाची पाहणी केली होती. यावेळी त्यांना बंगलोच्या विविध फ्लॅटचे टाळे तुटल्याचे दिसून आले. पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोणीतरी प्रवेश करुन आतील सामानाची चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार वर्सोवा पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आफ्ताब खान याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वर्सोवा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राहुल या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या बंगलोमध्ये प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.