शाळेच्या इमारत बांधकामासाठी डोनेशनच्या नावाने फसवणुक
वीस कोटीसाठी कमिशन म्हणून घेतलेल्या 25 लाखांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – अहमदनगर येथील एका शासन मान्यताप्राप्त संस्थेला शाळेच्या इमारत बांधकामासाठी एक महिन्यांत वीस कोटीचे डोनेशन म्हणून देतो असे सांगून कमिशन म्हणून घेतलेल्या सुमारे 25 लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन खाजगी कंपनीच्या प्रमुख संचालकाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धरमदेव क्रिष्णदेव राय आणि बिनू आशिष शहा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. डोनेशनच्या नावाने या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
57 वर्षांचे अंकुश भगवंत दराडे हे अहमदनगरचे रहिवाशी आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून ते सावेर्डी येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमघ्ये प्राचार्य म्हणून काम करतात. या शाळेचे कामकाज महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत पाहिले जाते. ही शिक्षण संस्था नोंदणीकृत असून शासन मान्यताप्राप्त आहे. याच संस्थेत ते चिटणीस म्हणूनही काम करतात. शाळेसाठी पक्की बांधकाम असलेली तीन ते चार मजल्याचे इमारत उभारणीसाठी संस्थेला डोनेशनची गरज होती. त्यामुळे संस्थेने काही कॉर्पोरेट कंपन्यांना मेलद्वारे डोनेशनसाठी विनंती पाठविले होते. त्यासाठी ते स्वत प्रयत्नशील होते. गेल्या वर्षी त्यांना गोरेगाव येथील लिंक रोड, बांगुरनगर मेट्रो स्टेशनजवळील एल. आर कन्सल्टन्सी व आटपाटी फिल्मस कंपनीकडून कॉर्पोरेट कंपन्याकडून अशा संस्थेला आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ते त्यांचा मित्र युनूस शब्बीर पठाण यांच्यासोबत मुंबईतील संबंधित कार्यालयात आले होते. त्यांनी कंपनीचे प्रमुख धरमदेव राय आणि बिनू शहा यांची यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या संस्थेची माहिती सांगितली होती.
या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर या दोघांनी त्यांना त्यांच्या संस्थेला एका महिन्यांत वीस कोटी रुपयांचे डोनेशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना 25 लाख रुपये आगाऊ रक्कम त्यांच्या कंपनीत भरण्यास सांगितले होते. संस्थेकडे इतकी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने 25 लाख रुपये जमा केले होते. काही दिवसांनी अंकुश दराडे यांनी त्यांना 12 लाख 75 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले तर 12 लाख 15 हजार कॅश स्वरुपात असे 24 लाख 90 हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी काही कॉर्पोरेट कंपन्यांशी त्यांची मिटींग घडवून आणण्याचे आश्वासन दिले, मात्र ही मिटींग घडवून आणली नाही. त्यांना डोनेशनबाबत विचारणा करण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेही त्यांना भेटण्याचे टाळत होते.
चौकशीदरम्यान ए. आर कन्सल्टन्सी आणि आटपाटी फिल्मस ही कंपनी बोगस असून या कंपनीने अनेकांची फसवणुक केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे डोनेशनसाठी कमिशन म्हणून दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली होती. यावेळी या दोघांनी ही रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला. डोनेशनच्या नावाने या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच अंकुश दराडे यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर धरमदेव राय आणि बिनू शहा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.