पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग
बोरिवलीतील घटनेने संताप; रिक्षाचालकाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शाळेत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करणार्या एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा अज्ञात रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी बळीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध एमएचबी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पंधरा वर्षांची ही मुलगी बोरिवली परिसरात राहत असून सध्या दहावीत शिकते. शनिवारी सकाळी सव्वासात वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. शाळेत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करताना रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडल्याचा बहाणा करुन या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आधी बीएमसी गार्डन आणि नंतर गणपत पाटील नरग टमाटर मार्केटजवळ त्याने तिच्या पायावर, मांडीवर आणि छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तेथून पळून गेली होती. घडलेला प्रकार नंतर तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध ७४ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपी रिक्षाचालकाच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन रिक्षाचालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. शनिवारी सकाळी शाळेत जाणार्या मुलीचा अज्ञात रिक्षाचालकाने केलेल्या विनयभंगाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.