मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – वांद्रे-वरळी सी लिंकवर भरवेगात जाणार्या एका कारची धडक लागून झालेल्या अपघातात 50 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख पटली नसून तिची ओळख पटविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. अपघातानंतर आरोपी व्यावसायिक चालक गुरुविंदरसिंग कुलबीरसिंग किर याने वांद्रे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात रविवारी 13 जुलैला रात्री साडेदहा वाजता वांद्रे-वरळी सी लिंक, एमएसआरडीएस कार्यालयाजवळील उत्तर वाहिनीवर झाला. गुरुविंदरसिंग किर हा व्यावसायिक असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रु येथील दौलतनगर, सर्वोत्तम सोसायटीमध्ये राहतो. त्याचा स्वतचा क्रेशन प्लॅण्टचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री दहा वाजता तो त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून घरी जात होता. ही कार वांद्रे-वरळी सी लिंकवरुन जात असताना रस्ता क्रॉस करताना त्याने एका महिलेला जोरात धडक दिली होती.
या अपघातात ही महिला गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर तो वांद्रे पोलीस ठाण्यात आला आणि त्याने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत महिलेचे वय अंदाजे 50 असून तिची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
पोलीस ठाण्यात आलेल्या गुरुविंदरसिंग यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यांनी कार चालविताना मद्यप्राशन केले नसल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अमोल जयवंत नावडकर यांच्या तक्रारीवरुन गुरुविंदसिंग यांच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.