सनबर्न फेस्टिवलमध्ये डॉक्टरचे सोन्याचे कडे चोरी करणारा बाऊंसर गजाआड
गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे कडे चोरी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 डिसेंबर 2025
मुंबई, – सनबर्न फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या एका डॉक्टरचे तीन लाखांचे सोन्याचे कडे चोरी केल्याप्रकरणी विकी जितेंद्र गायकवाड नावाच्या 24 वर्षांच्या बाऊंसरला शिवडी पोलिसांनी अटक केली. विकी हा मूळचा सोलापूरचा रहिवाशी असून चोरीनंतर तो गावी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र गावी जाण्यापूर्वीच त्याला चोरीच्या सोन्याच्या कड्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. फेस्टिवलमध्ये असलेल्या गर्दीसह तक्रारदार डॉक्टरसह मित्रांनी मद्यप्राशन केल्याचा फायदा घेऊन त्याने त्यांच्या पॅण्टच्या खिशातून सोन्याचे कडे चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शिवप्रसाद टुन्डप्पा सज्जन हे 29 वर्षांचे तक्रारदार डॉक्टर असून मूळचे कर्नाटकच्या कलबुर्गीचे रहिवाशी आहेत. याच परिसरातील त्यांच्या मालकीचे बसवा नावाचे एक हॉस्पिटल आहे. 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत शिवडी येथे सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी ते मुंबईत आले होते. या दरम्यान ते फोर्ट येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 21 डिसेंबरला सायंकाळी ते त्यांच्या मित्रांसोबत व्हीव्हीआयपीमध्ये बसले होते. तिथे त्यांनी मदयप्राशन करत कार्यक्रमांचा आनंद घेतला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे कडे त्यांच्या पॅण्टच्या खिशात ठेवले होते.
रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर ते हॉटेलला जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी खिशातून सोन्याचे कडे काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांना सोन्याचे कडे चोरीस गेल्याचे लक्षात आले. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून सोन्याचे कडे चोरी केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सोन्याचे कडे आणि तीस हजार रुपये चोरीस गेल्याची शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांनी गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंह खुळे यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त विजयकुमार सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंह खुळे, पोलीस हवालदार यादव, कदम, साटम, पोलीस शिपाई लाड, माळोदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये शिवकुमार सज्जन हे त्यांच्या मित्रांसोबत व्हीव्हीपीआय गोल्ड येथे असल्याचे दिसून आले. त्यांच्या बाजूलाच सात बाऊंसर, सुपरवायझर आणि इतर दहा कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.
यावेळी विकी गायकवाड चौकशीत विसंगत माहिती देत होता. त्याची सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेच्या भीतीने विकी हा त्याच्या सोलापूर येथील गावी पळून जाण्याचा तयारीत होता, मात्र गावी जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन लाखांचे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सोन्याचे कडे पुन्हा मिळाल्याने डॉक्टर शिवप्रसाद टुन्डप्पा सज्जन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंह खुळे व अन्य पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले होते.
