सनबर्न फेस्टीवलमध्ये चोरी करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
19 लाखांचा चोरीच्या मुद्देमालासह पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 डिसेंबर 2025
मुंबई, – शिवडी येथे झालेल्या सनबर्न फेस्टीवल 2025 मध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. उड्डगलप्पा दासा भोवी, शाहबाज भोले खान ऊर्फ शोएब, मोहितकुमार रामकुमार पटेल, निखील एकनाथ यादव, आणि महेशकुमार सुनेहरीलाल कुंभार अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण दिल्ली आणि कर्नाटकचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे एकोणीस मोबाईल, गुन्ह्यांतील वाहन असा 19 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्या अटकेने अशाच इतर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्पेस बाऊंड वेब लॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सनबर्न म्युझिक फेस्टीवल या कार्यक्रमांचे आयोजन करण्तात आले होते. 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत शिवडीतील अटल सेतू जवळील शिवडी टिंबर पॉण्ड प्लॉटमध्ये हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कार्यक्रमाला वाढता प्रतिसद पाहता गर्दीचा फायदा घेऊन काही चोरटे चोरीच्या उद्देशाने तिथे सामिल झाले होते. याच गर्दीचा फायदा घेऊन काही लोकांचे मोबाईल चोरीस गेले होते. याबाबत काही तक्रारी शिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
विशेष महणजे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीसह महिलांशी गैरवर्तन, पिक पॉकेटिंगसारखे प्रकार घडू नये म्हणून शिवडी पोलिसांनी तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तरीही अज्ञात चोरट्याने हातसफाई करुन काही लोकांचे महागडे मोबाईलची चोरी करुन पलायन केले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त पंढरीनाथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, पोलीस निरीक्षक दिलीप मसराम, अनिल देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ पिंगळे, सागर काळेकर, स्नेहलसिंह खुळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार विकास कदम, अनिल यादव, अरुण वाडिले, अजीत कदम रितेश साटम, संदीप साळेकर, पोलीस शिपाई कमरुद्दीन शेख, दिपक माळोदे, अमोल लाड, संभाजी घाडगे यांनी संशयास्पद फिरणार्या उडुगलप्पा भोवी या 24 वर्षांच्या आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत तो मूळचा कर्नाटकच्या शिवमोग्गाचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे पोलिसांना दोन लाख रुपयांचे चार चोरीचे मोबाईल सापडले. या मोबाईलविषयी तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता. अखेर त्याने सनबर्न फेस्टीवलमध्ये मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने शिवडीतील फॉसबेरी रोड, इंदिरानगर, के शेडजवळ एका कारमधून आलेल्या चार संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी किया कॅरेन्झ कंपनीची कारसहीत पंधरा चोरीचे मोबाईल जप्त केले.
चौकशीत त्यांची नावे शाहबाज खान, मोहितकुमार पटेल, निखील यादव आणि महेशकुमार कुंभार असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण दिल्लीतील रहिवाशी असून चोरीच्या उद्देशाने सनबर्न फेस्टीवलमध्ये आल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 19 लाख 40 हजार रुपयांचे एकोणीस मोबाईल जप्त केले आहेत. मोबाईल चोरी करणारी ही आंतरराज्य टोळी असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.