कस्टमने जप्त केलेल्या ४२ लाखांच्या गारमेंट मालाची चोरी
शिवडीतील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – कस्टम ड्युटी चुकवून चायना येथून आयात करण्यात आलेला सुमारे ४२ लाखांचा गारमेंट मालाची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना शिवडीतील एमओडी एमबीपीटीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी कस्टम अधिकार्याने दिलेल्या तक्रारीवरुन शिवडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अशाच प्रकारे उरण पोलिसांनी तीन कंटेनरसह आतील मालाची चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चंद्रशेखर रासबिहारी सिंह हे पवईतील कस्टम कॉलनीत राहत असून सध्या ते कस्टम विभागात मूल्य निरुपक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग शिवडीतील एमओडी एमबीपीटी येथे आहे. फेब्रुवारी २०२२ रोजी चायना येथून आयात करण्यात आलेला साई इंटरप्रायजेसचा कपड्याचे कंटेनर कस्टम अधिकार्यांनी जप्त केला होता. हा मुद्देमाल शिवडीतील कस्टमच्या गोदामात ठेवण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत अज्ञात चोरट्याने गोदामात प्रवेश करुन चोरी केला होता. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत विविध कंपन्यांचे आठ कंटेनर बाहेरगावातून आले होते. कस्टम क्लिअरसाठी ते कंटेनर आणि आतील सामान ताब्यात घेण्यात आला होता. या कंटेनरमधील काही माल चोरीस गेल्याचे नंतर उघडकीस आले होते. पंचनामा करताना ओम साई इंटरप्रायजेस कंपनीने आयात केलेला माल आणि चोरीनंतर झडती घेण्यात आलेल्या मालामध्ये प्रचंड तफावत दिसून आली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने संबंधित गारर्मेट मालाची चोरी केल्याचे दिसून आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती. त्यात गेल्या दिड वर्षांत सुमारे ४२ लाख ४२ हजार १०४ रुपयांचा माल चोरी केल्याचे उघडकीस आले होते. याबाबतचा एक अहवाल नंतर वरिष्ठ अधिकार्यांना सादर करण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत या अधिकार्यांनी चंद्रशेखर सिंह यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी शिवडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अशाच प्रकारे उरण पोलीस ठाण्यात कस्टम विभागाने जप्त केलेल्या तीन कंटेनरची चोरीची तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.