भंगार व्यापार्‍याची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या

शिवडीतील घटना; तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जून २०२४
मुंबई, – शिवडी येथे हसमभाई काण्या या ५० वर्षांच्या भंगार व्यापार्‍याची तीनजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. हत्येनंतर तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.

ही घटना शनिवारी १ जूनला दुपारी दोन वाजता शीव येथील ब्रीक बंदरजवळील गॅरेजजवळ घडली. शेख उस्मान अहमद ऊर्फ शकील हे वयोवृद्ध वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरात राहतात. शिवडीतील ब्रीक बंदर परिसरात त्यांच्या मालकीचे गाडी दुरुस्तीचे एक गॅरेज आहे. त्यांच्याच गॅरेजच्या बाजूला हसमभाई काण्या यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित असून त्यांची चांगली मैत्री होती. शनिवारी दुपारी एक वाजता शेख उस्मान हे त्यांच्या गॅरेजमध्ये काम करत होते. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी जुन्या वादातून हसमभाई यांच्यावर चाकूने वार केले. यावेळी शेख उस्मान यांनी तिघांनाही जाब विचारला असता त्यांनी त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या हल्ल्यानंतर ते तिघेही बाईकवरुन लक्ष्मी पेट्रोलपंप आणि सीआरपीएच्या दिशेने पळून गेले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या हसनभाई यांना शेख उस्मानसह इतरांना तातडीने भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

चाकू हल्ल्यात हसनभाई यांच्या पायाला, हाताला, पोटाला गंभीर दुखापत झाली होती. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शेख उस्मान यांच्या जबानीवरुन पोलिसांनी तिन्ही मारेकर्‍याविरुद्ध ३०२, ५०४, ५०६, ३४ भादवी सहकलम १३५, ३७ (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page