मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – विक्रोळीतील एका निवासी इमारतीमध्ये चालणार्या एका सेक्स रॅकेटचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक तर तीन महिलांची सुटका केली. तिन्ही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. संगीता ऊर्फ नेहा आणि उदय शिवदास मार्शेलकर अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रोळीतील एका निवासी इमारतीमध्ये संगीता ही भाड्याच्या रुममध्ये राहत असून ती तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत होती. अनेकदा ती ग्राहकांना तिच्या घरी बोलावत होती तर ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणींना त्यांच्यासोबत विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत होती. ही माहिती प्राप्त होताच विक्रोळी पोलिसांनी त्याची शहानिशा करण्यासाठी दोन बोगस ग्राहकांच्या मदतीने संगीताला संपर्क साधला होता. तिच्याकडे काही महिलांची मागणी करुन पैशांबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी तिने प्रत्येक महिलेमागे दहा हजार रुपयांचा मोबदला घेत असल्याचे सांगितले. ग्राहकाने होकार दर्शविल्यानंतर तिने त्याला विक्रोळीतील कन्नमवारनगर, इमारत क्रमांक आठ/बी, रुम क्रमांक २१०३ मध्ये बोलावून घेतले होते.
ठरल्याप्रमाणे मंगळवारी २७ फेब्रुवारीला दुपारी बोगस ग्राहक तिथे गेला होता. यावेळी तिथे असलेल्या संगीतासह उदयसोबत ग्राहकाचा पैशांची देवाणघेवाण सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हिरडेकर, पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तांबे, पोलीस उपनिरीक्षक तेजश्री नरके, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई उंडरे, सोनजे, महिला पोलीस शिपाई तारा चौधरी यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी रुममध्ये असलेल्या संगीता महाजन आणि उदय मार्शेलकर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच रुममधून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. चौकशीदरम्यान त्या तिघीही गरीब कुटुंबातील असून घरच्या हलखीच्या परिस्थितीमुळे संगीता सांगत असलेल्या ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी जात असल्याचे सांगितले. ग्राहकांकडून मिळालेल्या पैशांतून त्यांना दोन ते तीन हजार रुपयांचा मोबदला दिला जात होता. उर्वरित रक्कम संगीता आणि उदय हे आपसांत वाटून घेत होते.
तपासात ही माहिती उघड होताच तिन्ही महिलांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. दुसरीकडे महिला उपनिरीक्षक तेजश्री नरके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संगीता आणि उदय यांच्याविरुद्ध भादवीसह पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दहा हजाराची कॅश, मोबाईलसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.