मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन ग्राहकांना विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये शारीरिक संबंधासाठी मुली पुरविणार्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सुलोचना नावाच्या एका 42 वर्षांच्या दलाल महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींनाही अंधेरीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
सुलोचना ही ठाण्यातील दिवा परिसरात राहत असून ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ती विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये शारीरिक संबंधासाठी मुली सप्लाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने सुलोचनाला संपर्क साधून तिच्याकडे काही मुली मागणी केली होती. यावेळी सुलोचना आणि बोगस ग्राहकामध्ये फोनवरुनच संपूर्ण व्यवहार झाला होता. यावेळी तिला मुलींना घेऊन अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता सुलोचना ही तीन तरुणीसोबत अंधेरीतील मरोळ मेट्रो स्थानकाजवळ आली होती. तिचे ग्राहकाशी आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कारवाई केली होती. सुलोचनाला ताब्यात घेतल्यानंतर तिन्ही तरुणींची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. यावेळी या तिघींनी त्या सुलोचनाच्या सांगण्यावरुन विविध ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी जात असल्याचे सांगितले. ग्राहकाकडून मिळणार्या रक्कमेतून काही रक्कम सुलोचना स्वतकडे ठेवत होती, उर्वरित रक्कम ती त्यांना देत होती.
सुलोचना ही सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस येताच तिच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही बळीत तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना अंधेरीतील विरा देसाई रोडवरील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.