सेक्सट्रार्शनच्या जाळ्यात अडकवत डॉक्टरची ऑनलाईन फसवणुक
94 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – इंटाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणीने वडाळ्यातील एका 35 वर्षांच्या डॉक्टरला सेक्ट्रॉर्शनच्या जाळ्यात अडकवत सुमारे 94 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकस आला आहे. याप्रकरणी सौम्या मनदिपसिंग अवस्थी नाव सांगणार्या तरुणीविरुद्ध मध्य प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्यांनी फसवणुकीसह खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
35 वर्षांचे तक्रारदार डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वडाळ्यातील आरएके मार्गवरील एका निवासी इमारतीमध्ये त्यांच्या कुटुंबियंसोबत राहतात. ते सध्या परळच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑर्थेपेटीक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. 6 फेब्रुवारीला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना सौम्या नावाच्या एका तरुणीची फे्ंरण्ड रिक्वेस्ट आली होती. कुठलीही शहानिशा न करता त्यांनी तिची फे्ंरण्ड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. तिने ती चंदीगढच्या ज्ञानसागर मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. तिने तिचे आई-वडिल दिल्लीचे रहिवाशी असून ते तिथेच राहतात. आपण लहानपणापासून एकटीच राहत असल्याचे सांगून एकटी आणि निराश असल्याचे भासवून त्यांच्याशी सेक्स चॅटींग सुरु केले होते.
चॅटदरम्यान ती त्यांच्याकडे महागडे गिफ्टची मागणी करत होती. त्यामुळे ते तिला गिफ्टसाठी ऑनलाईन पैसे पाठवत होते. चॅटदरम्यान तिने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांना लवकरच भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. याचदरम्यान तिने तिचे काही न्यूड फोटो पाठवून त्यांनाही त्यांचे न्यूड फोटो पाठविण्यास प्रवृत्त केले होते. तिच्या बोलण्यावर भुलून त्यांनी तिला काही न्यूड फोटोसह व्हिडीओ पाठविले होते. 2 मेला तिने त्यांना एका वेबपेजची लिंक आणि तिला वन्स बिवमोडमध्ये पाठविलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉप पाठविले होते. तिचा व्हॉटअप चॅट थायलंडच्या एका हॅकरने हॅक केला असून तिच्याकडे अडीच कोटीच्या बीटकॉईनची मागणी करत असल्याचे सांगितले. बीटकॉईन न दिल्यास त्यांच्यातील सेक्स चॅट, न्यूड फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी तिला हँकरची माहिती शेअर करण्यास सांगितले.
मात्र तिने त्याची माहिती शेअर केली नाही. तिने तिचे सर्व सोन्याचे दागिने विकून, तिच्या मित्रांसह परिचितांकडून पैसे उसने घेऊन काही पैशांची जुळवाजुळव करत असल्याचे सांगितले. तसेच तिने त्यांनाही पैशांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. याच दरम्यान सौम्याने त्यांना एक ड्राफ्ट तयार करुन पाठविले होते. त्यात त्यांच्या हॉस्पिटलसह मेडीकल कॉन्सिलला मेल करुन ते तिचेशोषण करीत असल्याचा आरोप करुन त्यांचे न्यूड फोटोसह व्हिडीओ पाठविण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले होते. समाजात बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला पैसे पाठविण्याची तयारी दर्शविली होती.
7 एप्रिल ते 30 जुलै 2025 या कालावधीत त्यांनी तिला टप्याटप्याने 94 लाख 47 हजार रुपये पाठविले होते. ऑनलाईन रक्कम पाठविताना ती रक्कम जॅस्मिन कौर या महिलेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिच्या इंटाग्राम प्रोफाईलची पाहणी केली होती. त्यात त्यांना सार्थक जैन नावाचा एका मित्राच्या माहितीसह त्यांचे काही फोटो दिसून आले. त्यानंतर त्यांनी चंदीगढच्या ज्ञानसागर मेडीकल कॉलेजच्या 2021 च्या अॅडमिशन लिस्टची पाहणी केली होती. त्यात त्यांना सौम्या रोहित अवस्थी हिने बीए अॅडमिशन घेतल्याचे समजले.
सौम्याकडून आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सौम्या अवस्थी नाव सांगणार्या तरुणीविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे, फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.