मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्यांना खंडणीसाठी सुरु असलेल्या धमक्याचे सत्र सुरुच आहे. दबंग सिनेअभिनेता सलमान खाननंतर आता बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला एका अज्ञात व्यक्तीने ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे. ही धमकी संबंधित व्यक्तीला थेट शाहरुखला न देता वांद्रे पोलीस ठाण्यातील लॅडलाईनवरुन करुन पोलिसांच्या माध्यमातून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. गेल्या आठवड्यातील खंडणीसाठी आलेल्या धमकीची ही सहावी घटना आहे.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. दहशत निर्माण करण्यासाठी बिष्णोई टोळीने सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची बिष्णोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचाच काही लोकांनी फायदा घेण्यास सुरुवात केली होती. त्यातून गेल्या काही दिवसांपासून सलमानला बिष्णोई टोळीशी असलेला वाद संपविण्यासाठी सतत खंडणीसाठी धमकी जात होती. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा आमदार पूत्र झिशान सिद्धीकीसह पुन्हा सलमानला खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी काही स्वतंत्र गुन्हे दाखल होताच संबंधित धमकी देणार्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोशल मिडीयातून मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी खोडसाळ म्हणून ही धमकी दिल्याचे उघडकीस आले होते.
खंडणीसाठी सुरु असलेल्या धमकीचे सत्र सुरु असताना आता बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानला खंडणीसाठी धमकी आली आहे. शाहरुखकडे अज्ञात व्यक्तीने ५० लाखांची मागणी केली आहे. ही रक्कम दिली नाहीतर त्याचा गेम करु अशी धमकीच त्याला पोलिसांच्या माध्यातून देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी वांद्रे पोलीस ठाण्याच्या लॅडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव हिंदुस्तानी असल्याचे सांगून शाहरुखला सांगा ५० लाख रुपये तयार ठेव नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगितले. ही माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
सलमान खान, झिशान सिद्धीकीनंतर आता शाहरुखला आलेल्या धमकीने बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शाहरुख खान हा वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डजवळील मन्नत बंगल्यावर राहतो. त्याला मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे. तसेच त्याची स्वतची सुरक्षा आहे. त्यामुळे या धमकीनंतर शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरील सुरक्षा वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात या धमकीमागे कुठल्याही संघटित टोळीचा सहभाग नसून कोणीतरी खोडसाळपणाने हा कॉल केल्याचे बोलले जाते. प्राथमिक तपासात काही गोष्टींचा उलघडा झाला असून आरोपीच्या अटकेसाठी दोन टिम मुंबईबाहेर पाठविण्यात आल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.