हॉस्पिटलमध्ये दाखल असताना मित्रांचा सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई
महिलेच्या मुलाच्या दोन मित्रांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2026
मुंबई, – धारावीतील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असताना एका 55 वर्षांच्या महिलेच्या मुलाच्या दोन मित्रांनी तिची तब्येतीची विचारपूस करुन, जुनी हॉस्पिटलची फाईल आणतो असे सांगून तिच्या घरात प्रवेश करुन सुमारे पाच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन जेम्स ऊर्फ ब्रदर आणि फिरोज या दोन्ही मित्रांविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी मित्र पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
खुर्शिदा अहमद शेख ही 55 वर्षांची महिला धारावी परिसरात राहते. तिच्या पतीने दुसरे लग्न केले असून तो सध्या त्याच्या दुसर्या पत्नीसोबत राहतो. त्याची विवाहीत मुलगी तिच्या सासरी तर मोठा मुलगा नालासोपारा येथे राहतो. लहान मुलगा जावेद हा तिच्यासोबत राहत असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तो सध्या बांधकाम कॉन्ट्रक्टर म्हणून तर दहा वर्षांपूर्वी खुर्शिदा ही कुवेत ही मोलकरीण म्हणून काम करत होती. सध्या ती घरीच असते. गेल्या वर्षी जावेदला एमडी ड्रग्जच्या एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या तळोजा कारागृहात आहे. अधूनमधून तो कारागृहातून तिला कॉल करतो.
जेम्स आणि फिरोज हे जावेदचे मित्र असून अनेकदा ते दोघेही तिच्यासोबत तळोजा कारागृहात जावेदला भेटण्यासाठी तिच्यासोबत जात होते. त्यांनी जावेदला सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला होता. गेल्या काही दिवसांपासून खुर्शिदाची प्रकृती ठिक नव्हती. यावेळी या दोघांनी तिला उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. 12 फेब्रुवारीला ते दोघेही तिला पाहण्यासाठी तिच्या घरी आले होते. यावेळी तिची शुगर 400 वर गेल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागणार होते, त्यासाठी या दोघांनीच तिला मदत केली होती. त्यांनी तिला धारावीच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. यावेळी तिने तिच्या घराची चावी फिरोजकडे दिली होती. हॉस्पिटलमध्ये असताना या दोघांनी तिची फाईल आणतो असे सांगून तिच्या घरी जात असल्याचे सांगितले होते.
दुसर्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळताच ती तिच्या घरी आली होती. याच दरम्यान तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने कपाटातील बॅगेत सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला कुठेच दागिने सापडले नाही. तिच्या घरी जेम्स आणि फिरोज वगळता इतर कोणीही येत नव्हते. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना तिने विश्वासाने फिरोजकडे घराची चावी दिली होती. याच दरम्यान या दोघांनी घरात प्रवेश करुन तिच्या सुमारे पाच लाखांच्या विविध सोन्याच्या चोरी केली होती. हा प्रकार तिच्या लक्षात येताच दोघांकडे विचारणा केली होती. त्यांनी दागिने परत केले नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची करणार असल्याचे सांगितले.
मात्र या दोघांनीच तिला पोलिसांत तक्रार केली तर तिच्यासह तिच्या मुलाला बघून घेण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार केली होती. दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार शाहूनगर पोलिसांना सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जेम्स आणि फिरोज या दोघांविरुद्ध सोन्याचा दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.