हॉटेल व्यावसायिकाकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी
खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – माटुंगा परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष वसंत मोरे आणि जावेद ऊर्फ जावेद टकल्या अशी या दोघांची नावे असून ते शाहूनगरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चंद्रशेखर राजवंत सिंग हे हॉटेल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत माटुंगा परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे अपूर्वा बार अॅण्ड रेस्ट्रॉरंट नावाचे एक हॉटेल आहे. आशिष मोरे आणि जावेद टकल्या हे दोघेही त्यांच्या परिचित असून त्यांच्या हॉटेलमध्ये नियमित येतात. या हॉटेलच्या विरोधात महानगरपालिकेत खोट्या तक्रारी करुन त्यांच्या हॉटेलवर कारवाई करण्याची त्यांनी त्यांना धमकी दिली होती. मनपामध्ये हॉटेलविरोधात खोट्या तक्रारी करु नये तसेच त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरु राहण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांच्याकडून त्यांना सतत धमकी दिली जात होती.
या धमक्यांना कंटाळून चंद्रशेखर सिंग यांनी शाहूनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशिष मोरे आणि जावेद टकल्या या दोघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले असून या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.