ब्लॅकमेल करुन महिलेला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
बहिणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – धारावी परिसरात राहणार्या एका महिलेला ब्लॅकमेल करुन तिला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीचे न्यूड व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून दोन हजार रुपये उकाळले आणि तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी खंडणीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी हा तक्रारदार महिलेसह तिच्या बहिणीचा परिचित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्या परिचित प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे बोलले जाते.
22 वर्षांची तक्रारदार महिला ही धारावीतील क्रॉस रोड परिसरात राहते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ती तिच्या घरी होती. यावेळी तिला इंटाग्रामवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन तिची लहान बहिणीचे काही न्यूड व्हिडीओ असल्याचा दावा केला होता. ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला क्यूआर कोड पाठविला होता. हा क्यूआर कोड स्कॅन करुन त्याला दोन हजार रुपये पाठविण्यास सांगितले. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे बहिणीची बदनामी नको म्हणून त्याला दोन हजार रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर तो तिला सतत ब्लॅकमेल करुन तिच्याकडे पैशांची मागणी करत होता.
सतत धमकी मिळत असल्याने तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिला तिच्या बहिणीचे न्यूड फोटो पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. तिने त्याला पैसे पाठविले नाहीतर तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तिचे अश्लील व्हिडीओ पाठविण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने शुक्रवारी शाहूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शाहूनगर पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सायबर सेलने संबंधित मॅसेज कोणी आणि कोठून पाठविला याचा तपास सुरु केला आहे. या घटनेमागे तक्रारदार महिलेच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.