मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – मद्यप्राशन करुन क्षुल्लक कारणावरुन सतत घरात वाद घालणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना माटुंगा परिसरात घडली. दारुच्या नशेत झालेल्या वादातून रागाच्या भरात लहान भावाची त्याच्याच मोठ्या भावाने दांडक्याने बेदम मारहाण करुन हत्या केली. नागराज कन्ना बानल असे हत्या झालेल्या मद्यपी भावाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी गोपाल कन्ना बानल याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर गोपालला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना रविवारी २५ फेब्रुवारीला माटुंगा येथील लेबर कॅम्प परिसरात घडली. याच परिसरात बानल कुटुंबिय राहत असून गोपाल आणि नागराज हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. यातील लहान भाऊ नागराजला दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो क्षुल्लक कारणावरुन सतत घरात वाद घालून सर्वांना त्रास देत होता. लहान भाऊ असल्याने त्याकडे गोपाळ हा दुर्लक्ष करत होता. २५ फेब्रुवारीला रात्री उशिरा नागराज हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला आणि त्याने गोपालसोबत वाद घालून भांडण सुरु केले होते. त्यांच्यातील भांडण विकोपास गेले आणि रागाच्या भरात त्याने नागराजच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत त्याला गोपाळसह इतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान शुक्रवारी १ मार्चला रात्री उशिरा नागराजचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्यासह शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात हा प्रकार उघडकीस येताच गोपाळविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दारुच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी भावाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.