मूलबाल होत नसल्याचा बहाणा करुन मुलीच्या खरेदी-विक्रीचा पर्दाफाश
पालकांकडून ताबा घेतल्यानंतर तीन महिलांनी खरेदी केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जानेवारी 2026
मुंबई, – आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण असल्याने तसेच मूलबाल होत नसल्याचा बहाणा करुन पालकाकडून घेतलेल्या तीन महिन्यांच्या मुलीच्या खरेदी-विक्रीचा शाहूनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पालकाकडून ताबा घेतल्यानंतर या मुलीची तीन महिलांची खरेदी केल्याचे तपासत उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांसह तिन्ही महिलांविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. किर्ती रंजन शर्मा, रंजन विरेंद्र शर्मा, मीना ऊर्फ नासीरा हुसैन शेख, प्रिया राकेश राजगिरी ऊर्फ प्रिया खंदारे, अंजली रोशन सहानी अशी या पाचजणांची नावे आहेत.
अमीत जगन्नाथ बरकडे हे काळाचौकी पोलीस वसाहतीत राहतात. सध्या ते शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. यावेळी तिथे किर्ती शर्मा ही 20 वर्षांची महिला पोलीस ठाण्यात आली होती. तिने ती वसई-विरार येथील रिक्षा स्टॅण्डजवळील कारगिल रोड, संतोषभवन येथे राहत असून तिचे रंजन शर्मासोबत 2024 रोजी लग्न झाले होते. 11 ऑक्टोंबर 2025 रोजी तिने सर्वोदय हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला होता. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे तिला तिच्या रुमची मालकीण आल्फा हिने तिच्या मुलीला दत्तक देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिला मीना ऊर्फ नासीरा या महिलेचा फोन आला होता. तिने तिला तिची मुलगी दत्तक म्हणून हवी आहे.
लग्नानंतर मूलबाळ होत नसल्याने तिने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. तिच्यावर विश्वास ठेवून तिने तिला तिची मुलगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर किर्ती, तिचा पती रंजन आणि मैत्रिण शालिनी हे मीनाच्या माटुंगा येथील लेबर कॅम्प, न्यू गणेशनगर परिसरातील घरी गेले आणि त्यांनी तिला त्यांची मुलगी दिली होती. यावेळी त्यांनी वांद्रे येथील कोर्टातून मुलगी ताब्यात घेतल्याबाबत कागदपत्रे बनवून घेतले होते. मुलीचा ताबा मिळताच मिना ही किर्तीला तिच्या मुलीचे फोटो पाठवत होती. काही दिवसांनी या मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने मीनाने तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर तिने तिचे फोटो पाठविणे बंद केले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्याकडे तिच्या मुलीची चौकशी सुरु केली होती. यावेळी मीनाने तिला तिच्या नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले. चौकशीनंतर मिनाने तिची मुलगी प्रिया खंदारे आणि प्रियाने अंजली सहानीला पैसे देऊन दिल्याचे समजले. अशा प्रकारे मिनाने विविध लोकांकडून पैसे घेऊन तिच्या मुलीची विक्री केली होती. त्यामुळे तिने मीनाविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर पोलिसांनी किर्तीचा पती रंजन शर्माची जबानी नोंदवून घेतली होती, त्यानेही मुलीचा सांभाळ करु शकत नाही म्हणून मिनाला त्यांची मुलगी दत्तक देण्याचा संमतीने निर्णय घेतल्याचे सांगून वकिलाकडे तशी नोटरी केली होती. त्यासाठी त्यांनी मीनाकडून तीस हजार रुपये घेतल्याची कबुली दिली.
मिनाची चौकशी केल्यानंतर तिने किर्तीकडून तीस हजारामध्ये या मुलीची खरेदी केल्याची कबुली दिली. तिचे पती दारुच्या आहारी गेल्याने ती स्वत मुलीचा सांभाळ करु शकत नव्हती. त्यामुळे तिने किर्तीच्या मुलीची सलमा शेख हिच्या मदतीने प्रिया खंदारे हिला ऐंशी लाखांमध्ये विक्री केल्याचे सांगितले. प्रिया खंदारेची चौकशी केल्यानंतर तिने ती तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेल्याचे सांगून तिला मूलबाळ होत नसल्याने ती मुलगी अंजली सहानीला दिल्याचे सांगितले.
या कबुलीनंतर अंजली ही मुलीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली होती. तिने तिला लग्नानंतर सात वर्ष होऊन मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे तिने प्रियाकडे दत्तक मुलाविषयी विचारणा केली होती. यावेळी अंजलीने तिला ती मुलगी एक लाख तीस हजार रुपयांना विकल्याची कबुली दिली. या मुलीचा ताबा घेतल्यानंतर तिला माटुंगा येथील बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले होते.
7 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत तिच्या पालकांनी किर्ती आणि रंजन शर्मा यांनी मिनाला 40 हजारांमध्ये, मिनाने प्रिया खंदारेला 80 हजारामध्ये, प्रियाने अंजली सहानीला एक लाख तीस हजारांमध्ये मुलीची खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या सर्व आरोपीविरुद्ध शाहूनगर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली.