शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्धाची फसवणुक
75 लाखांच्या खाजगी बँकेच्या वेल्थ मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर बारा टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे 75 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार जुहूस्किम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका नामांकित बँकेत वेल्थ मॅनेजर असलेल्या जय मुकेश मेहता याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जय मेहताने अशाच प्रकारे इतर लोकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातला आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
60 वर्षांचे योगेश पुरुषोत्तम कौशल हे जुहूच्या जेव्हीपीडी, जुहू स्किम परिसरात त्यांची आई, पत्नी आणि मुलासोबत राहतात. लोअर परेल येथील एका खाजगी कंपनीत ते अध्यक्ष म्हणून काम करत होते. ऑक्टोंबर 2024 रोजी ते निवृत्त झाले. कंपनीत काम करताना त्यांचे वेतन एका खाजगी बँकेच्या सॅलरी अकाऊंटमध्ये जमा होत होते. तिथेच जय मेहता हा वेल्थ मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती होती. अनेकदा बँकसंबधित काही तक्रारी असल्यास ते जय मेहताला संपर्क साधत होते. गेल्या दहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. शेअरमार्केटमध्ये काम करणारी एक टिम असून या टिमच्या माध्यमातून गुंतवणुक केल्यास त्यांना बारा टक्के परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते.
बँकेच्या ठेवीवर त्यांना आठ तर फिक्स डिपॉझिटवर सहा टक्के मिळणार होते, त्यामुळे ही रक्कम बँकेत ठेवण्यापेक्षा त्यांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी असा तो त्यांना सतत आग्रह करत होता. जय मेहतावर विश्वास असल्याने त्यांनी कुठलीही शहानिशा न करता त्याच्या सांगण्यावरुन ऑगस्ट 2023 रोजी त्याला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी तीस लाख रपुये दिले होते. सप्टेंबर 2023 रोजी या गुंतवणुकीवर त्याने त्यांना एक लाख चाळीस हजार परतावा दिला होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता. त्याने त्यांना आणखीन काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यासह फिक्स डिपॉझिटची सुमारे 45 लाख रुपये दिले होते.
अशा प्रकारे त्यांनी जय मेहताला ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी 75 लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्यांना चार धनादेश दिले. परताव्याची रक्कम जमा न झाल्यास त्यांना बँकेत धनादेश टाकण्यास सांगण्यात आले होते. मात्र ऑक्टोंबर 2024 पर्यंत त्यांना परताव्याची कुठलीही रक्कम मिळाली नव्हती. याबाबत विचारणा केल्यानतर त्याने मार्केटमध्ये मंदी असल्याने पैसे ट्रान्स्फर करण्यास विलंब होत आहे. मात्र त्यांना त्यांची रक्कम व्याजासहीत मिळेल असे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर त्याने त्यांना शपथपत्र लिहून दिले होते.
मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याने त्यांच्या मेलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा जय मेहताच्या मिरारोड येथील राहत्या घरी गेला होता. तिथे गेल्यानंतर तो घर सोडून पळून गेल्याचे मुलाच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार लक्षात येताच योगेश कौशल यांनी जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी जय मेहताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जय हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.