वयोवृद्धाला 60 लाखांना गंडा घालणार्या चार आरोपींना अटक
चांगला परतावा देण्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – ओएनजीसीमधून निवृत्त झालेल्या 74 वर्षांच्या वयोवृद्धाला सुमारे साठ लाखांना गंडा घालणार्या एका टोळीचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा, जिग्नेश मोहनभाई कलसरिया, महादेव जसूभाई गोढिया आणि रवी रामजीभाई आजगिरा अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण गुजरातच्या सुरत आणि गिरसोमनाथचे रहिवाशी आहे. आरोपींकडून पोलिसांनी चार मोबाईल, सात सिमकार्ड, बारा बँक खात्याची माहिती हस्तगत करण्यात आली आहे. ही टोळी ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना मदत करत असून त्याच्यासाठी त्यांनी विविध बँकेत खाते उघडले होते. याच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती.
यातील तक्रारदार वयोवृद्ध असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत ग्रॅटरोड परिसरात राहतात. ते ओएनजीसीमध्ये कामाला होता. निवृत्तीनंतर ते घरी राहत होते. एप्रिल 2024 रोजी त्यांना एका ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून आरोपींनी संपर्क साधला होता. त्यांना विविध शेअरमार्केट गुंतवणुकीची योजना सांगून या योजनेत गुंतवणुक केल्यास चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे साठ लाखांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम त्यांनी आरोपींच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. मात्र त्यांना कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम न देता संबंधित आरोपींनी त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. त्यात संबंधित आरोपी गुजरातचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने गुजरातच्या सुरत आणि गिरसोमनाथ परिसरात राहणार्या चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या चौकशीत जावेदभाई, जिग्नेश, महादेव आणि रवी यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याच बँक खात्यात 18 लाख 24 हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम नंतर गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असलेल्या सायबर ठगांना पाठविण्यात आली होती. त्यासाठी चारही आरोपींना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्याचे आले होते. फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणारी ही एक सराईत टोळी आहे. या टोळीने विविध बँकेत खाती उघडून त्याची माहिती संबंधित सायबर ठगांना दिली होती. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात लाखो रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.