शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने सव्वासहा लाखांची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका विमा कंपनीतील वरिष्ठ अधिकार्याची सुमारे सव्वासहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी भारत रमेशचंद्र मंडराविया या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. भारतवर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्विन शंकरलाल गोयंका हे गोरेगाव येथे राहत असून भांडुपच्या एका खाजगी विमा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सप्टेंबर महिन्यांत सेबी रजिस्टर असलेल्या एका खाजगी कंपनीने त्यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केला होता. त्यात शेअरमार्केट गुंतवणुकीबाबत टिप्स आणि मार्गदर्शन देण्यात येत होते. ग्रॅुपची ऍडमिन असलेल्या रोशन परदेशी हिने त्यांना शेअरसंदर्भातातील माहिती सांगून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. गु्रपमधील अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता.
सुरुवातीला काही ठराविक रक्कम गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यामुळे त्यांना रोशनसह तिचा सहकारी हसम नौका यांच्यावर विश्वास बसला होता. या दोघांनी त्यांना जास्त रक्कम गुंतवणुक करण्यास सांगून त्यांना जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी ६ लाख ३७ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना साडेसात लाख रुपये फायदा झाल्याचे दिून आले. त्यांच्या खात्यात १३ लाख ८७ हजार ३१८ रुपये जमा झाल्याचे दिसून आले होते. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत त्यांनी रोशनीकडे विचारणा केली होती. तिने त्यांना ३० टक्के रक्कम जमा केल्यानंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले. मात्र त्यांनी ही रक्कम ट्रान्स्फर केली नाहीतर त्यांची संपूर्ण रक्कम फ्रिज करण्याची धमकी दिली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून रोशनी परदेशी आणि हसम नौका यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी भारत मंडराविया याला अजमेर येथून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना त्याने बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँकेत फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.