शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणार्या चौकडीला अटक
बोगस कंपन्यांच्या नावाने बोगस बँक खाती उघडल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – चांगला परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यक्तीची साडेतेरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका सायबर टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. मोहम्मद जावेद अन्सारी, रेहान कौशर मेहफुज अलम, मोहम्मद अरफत बाबू शेख आणि आसिफ शरीफ खान अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या अटकेने मुंबईसह गुजरात तेलगंणा येथील सायबर सेलमध्ये दाखल असलेल्या तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. बोगस कंपन्याच्या नावाने त्यांनी विविध बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार प्रदीप शिवाजी चन्ने हे कुर्ला येथे राहत असून त्यांचा डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. जून महिन्यांत त्यांना एका महिलेचा मॅसेज आला होता. तिने त्यांच्याशी मैत्री करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने ती ट्रेडिंग अकाऊंटट असल्याचे सांगून अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना चांगला परतावा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. काही दिवसांनी तिने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांना एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने पाठविलेली लिंक ओपन करुन त्यांनी त्यांची माहिती अपलोड केली होती. या लिंकच्या माध्यमातून त्यांनी विविध शेअरमध्ये 13 लाख 40 हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक झाली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मध्य सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण डोरले, पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव, पोलीस अंमलदार श्रीकांत पोळ, किरण पाटील, दिपक पाटील, दिपक कोळी यांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान उपनिरीक्षक पूनम जाधव आणि पोलीस शिपाई दिपक पाटील यांना गुन्ह्यांत वापरलेले बँक खाती बोगस दस्तावेज देऊन उघडण्यात आल्याचे उघडकीस आले. याच दस्तावेजासह बँकेत दिलेल्या फोटोवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मशिदबंदर येथील दाणाबाजार, पटवा चेंबर्सच्या तिसर्या मजल्यावर छापा टाकून मोहम्मद जावेद, रेहान कौशर, मोहम्मद अरफत आणि आसिफ खान या चौघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. घटनास्थळाहून पोलिसांनी विविध बँकांमध्ये उघडण्यात आलेल्या बँक खात्याच्या तेरा किट, दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, आठ सिमकार्ड, क्रेडिट, डेबीट कार्ड तसेच बोगस खाती उघडण्यासाठी लागणारे दस्तावेज उदाहरणार्थ-आधार, पॅनकार्ड, लाईट बिल, गुमास्ता लायसन्स, अकाऊंट ओपनिंग फॉर्म आदी मुद्देमाल जप्त केला. या चौकशीत मोहम्मद जावेद हा इतर आरोपींच्या मदतीने ग्लोबल एक्सप्रेस लॉजिस्टिक, प्राईम ट्रेडिंग, प्राईम क्लिअर कार्गो सोलूशन आणि केडी ट्रेडर्स अशा वेगवेगळ्या नावाने, पत्त्यावर कंपनी सुरु केल्याचे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यात खाती उघडत असल्याचे उघडकीस आले.
याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. यातील ग्लोबल एक्सप्रेस लॉजिस्टिक आणि प्राईम ट्रेडिंगच्या बँक खात्यात प्रदीप चन्ने यांच्या फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. संबंधित खाते ज्या व्यक्तीच्या नावाने उघडण्यात आले होते, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद जावेद हा एजंट असून सायबर ठगांना फसवणुकीसाठी विविध बँकेत खाती उघडून देत होता. रेहान कौशर हा झारखंडचा, मोहम्मद अरफत हा मशिदबंदर तर आसिफ गोवंडीतील बैंगनवाडीचा रहिवाशी आहे. ते तिघेही मोहम्मद जावेदला मदत करत होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन दिले जात होते.
या टोळविरुद्ध पश्चिम सायबर सेल-मुंबई, गुजरात आणि तेलगंणा सायबर सेल विभागात तीन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून या तिन्ही गुन्ह्यांत ते चौघेही पाहिजे आरोपी आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या दस्तावेजावरुन त्यांनी उघडलेल्या बँक खात्याचा सायबर पोर्टलवरील पुणे, नवी मुंबई, तेलंगणा, आंधप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याच बँक खात्यांचा इतर गुन्ह्यांसाठी वापर झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.