शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाला 41 लाखांना गंडा
तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 नोव्हेंबर 2025
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका वयोवृद्धाची सुमारे 41 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस गावदेवी पोलिसांनी अटक केली. अमोल विश्वनाथ पाटील असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत प्रिया शर्मा नावाची महिला सहआरोपी आहे. या दोघांनी इतर आरोपींच्या मदतीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे अमोलची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीनंतर इतर आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
90 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रमेश चुगोमल पंजाबी हे त्यांच्या भावासोबत मलबार हिल येथे राहतात. जानेवारी 2025 रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात त्यांच्या कंपनीने शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग अॅप उडले असून त्यात विविध कंपनीचे शेअर मूळ किंमतीपेक्षा पाच ते वीस टक्के आहे. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. या मॅसेजमध्ये एक मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता प्रिया शमा्र नावाच्या महिलेने ती कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. तिनेही त्यांना त्यांच्या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.
यावेळी त्यांनी फोनवरुन गुंतवणुक करण्यास नकार देत तिला तिच्या कंपनीचा पत्ता पाठविण्यास सांगितले. त्यानंतर तिने त्यांना फोर्ट येथील महात्मा गांधी रोडवरील कार्यालयात बोलाविले होते. काही दिवसांनी ते तिला भेटण्यासाठी तिच्या कंपनीत गेले होते. यावेळी तिने त्यांना लॉबीमध्ये बसवून त्यांच्याशी चर्चा सुरु केली होती. इतक्या कमी किंमतीत शेअर तुम्ही कसे देऊ शकता याबाबत विचारणा केल्यानंतर तिने शेअरमार्केटमधून लिस्टेड कंपन्यांना संपर्क साधून त्यांच्याकडून एकाच वेळेस लॉटमध्ये शेअर खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यात त्यांना संबंधित कंपनीकडून सवलत मिळत असल्याचे सांगितले.
त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत होकार दर्शविल्यानंतर तिने त्यांचे ट्रेडिंग अकाऊंड उघडले होते. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत विविध शेअरमध्ये 41 लाख 51 हजार 700 रुपयांची गुंतवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार त्यांनी प्रिया शर्मा व तिचा सहाय्यक अकाऊंटटच्या मदतीने केला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी प्रियासह तिच्या सहकार्याला कॉल करुन पैशांबाबत विचारणा सुरु केली होती, मात्र काही दिवसांनी त्यांनी दिलेले सहा ते सात मोबाईल बंद येत होते. त्यांनी कंपनीला पत्रव्यवहार करुन याबाबत विचारणा केली होती.
यावेळी कंपनीने त्यांच्याकडे प्रिया शर्मा नावाची कुठलीही महिला काम करत नसल्याचे सांगितले. प्रिया शर्मा व तिचा सहाय्यकाने शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगला परतावा देते असे सांगून त्यांची 41 लाख 51 हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गावदेवी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गावदेवी पोलिसांनी शेअरसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु होता.
आरोपींचा शोध सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अमोल पाटील याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रिया शर्मा हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.