शेअरमध्ये दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
चार वॉण्टेड आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – शेअरमार्केटच्या गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गंडा घालणार्या एका टोळीचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह चौघांना वेगवेगळ्या परिसरातून ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अकील शेख, विजयकुमार सरबजीतप्रसाद पटेल, राजेंद्र बळवंत विधाते आणि अक्षय अशोक कणसे अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने शुक्रवार 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने तक्रारदारांची सुमारे पावणेसहा लाखांची फसवणुक केली असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजू मदनमोहम्मद छिब्बेर हे व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते अंधेरीतील शिव मंदिर रोड, आदर्शनगर परिसरात राहतात. 20 सप्टेबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन शेअर ट्रेडिंगबाबत माहिती दिली होती. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रववृत्त करण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी 20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत सुमारे पावणेसहा लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना दुप्पट रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे संबंधित ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रभात मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. त्यात समीर इंटरप्रायजेस या कंपनीच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्याचा मालक मोहम्मद अखिल असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे व त्यांच्या पथकाने धारावीतील 90 फिट रोड येथून मोहम्मद अखिलला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच इतर सहकार्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याचे दोन सहकारी विजयकुमार पटेल आणि राजेंद्र विधाते यादोघांना ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अखिलला वेगवेगळ्या कंपनीच्या नावे बँकेत खाती उघडण्यास अक्षय कणसे याने मदत केली होती. त्यासाठी त्याने बँक खात्याची युजर आयडी पासवर्ड, डेबीट कार्ड, चेकबुक आदी पुरविले होते.
तपासात ही माहिती प्राप्त होताच शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे व पोलीस शिपाई विक्रम सरनोबत यांनी घाटकेापरच्या बर्वेनगर परिसरातून अक्षयला ताब्यात घेतले. यातील मोहम्मद अखिल हा धारावी, विजयकुमार बिहार, राजेंद्र नाशिक तर अक्षय घाटकोपरचा रहिवाशी आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु केली आहे. या टोळीने शेअरमध्ये गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.