शेअरमधील गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा

वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस चार महिन्यांनी अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2026
मुंबई, – शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर हमखास दुप्पट रक्कम देण्याचा दावा करुन एका सिव्हिल इंजिनिअर महिलेची सुमारे वीस लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आनंदा ईश्वर आसबे या मुख्य आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच ईश्वर हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच गुन्ह्यांत अरुणा आनंदा आसबे, अंकुश देशपांडे, रमेश यशवंत काळे, गजानन अंबी आणि अन्य एका आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून या पाचजणांना सहआरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रावणी राजेंद्र नारकर ही महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. ती सिव्हिल इंजिनिअर असून तिने आतापर्यंत अनेक खाजगी कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यातून तिने काही सेव्हींग केली होती. अंकुश देशपांडे हा गेल्या पंधरा वर्षांपासून तिच्या परिचित असून तोदेखील सिव्हिल आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने तिला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना तिला गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्याने तिची आनंदा आसबे आणि अरुणा आसबेशी ओळख करुन दिली होती. त्यांनी ते कोल्हापूरचे रहिवाशी असून त्यांनी आतापर्यंत शेअरमार्केटमध्ये अनेकांच्या पैशांची गुंतवणुक केली आहे.

या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळवून दिल्याचा दावा केला होता. तिलाही गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून त्यांनी तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने शेअरमार्केटमध्ये डिसेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत टप्याटप्याने सुमारे वीस लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तिला मार्च 2024 पासून परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यासाठी तिला काही रक्कमेचे धनादेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी तिला गुंतवणुकीवर परतावा दिला नाही. तिने सायन येथे फ्लॅट घेतला होता. त्यासाठी तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने एक धनादेश बँकेत टाकला होता.

मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. या प्रकारानंतर तिला संबंधित आरोपींवर संशय निर्माण झाल्याने तिने त्यांच्याकडे तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता तिची फसवणुक केली होती. पैशांची मागणी करत असल्याने त्यांनी तिला शिवीगाळ करुन धमकी देण्यास सुरुवात केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आनंदा आसबे, अरुणा आसबे, अंकुश देशपांडे, रमेश काळे, गजानन अंबी व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या या कटातील मुख्य आरोपी आनंद आसबे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने इतर सहकार्‍यांच्या मदतीने श्रावणी नारकर या महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांना दुप्पट रक्कमेसह चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page