शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ६५ लाखांची फसवणुक
डॉक्टरच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जून २०२४
मुंबई, – बोगस ऍपद्वारे शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका ५२ वर्षांच्या डॉक्टरची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ६५ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सायबर सेल पोलिसांनी करण बत्रा आणि राकेश सिंग नाव सांगणार्या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. या दोघांनी गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार डॉक्टरला एक बोगस ऍपमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुशील रत्नाकरराव मानुरे हे डॉक्टर असून ते अंधेरीतील एमआयडीसी परिसरात त्यांची पत्नी अर्चनासोबत राहतात. ते एमबीबीएस डॉक्टर असून सध्या जोगेश्वरीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. त्यात करण बत्रा आणि राकेश सिंग असे दोघेजण ऍडमिन होते. ग्रुपमध्ये नियमित शेअरसंदर्भातील माहिती अपलोड केली जात होती. सभासदांाना शेअरमार्केटमधील इन्स्टीट्यूशनल ट्रेडिंगमध्ये ५० टक्के प्राफिट, ऑनलाईन गाईडंस, आयपीओमध्ये ३०० टक्के प्राफिट तसेच पहिल्या प्रायव्हेट इक्विटी फंडमध्ये शेअर होल्डर बनणयाची संधी असल्याचे सांगून विविध योजनेची माहिती देणयात आली होती. या योजनेची माहिती घेतल्यांनतर त्यांनी त्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी करण बत्राने त्यांना प्लेस्टोअरमधून एफ एफटीपीएल नावाचे एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ते ऍप डाऊनलोड करुन त्यांची वैयक्तिक, मोबाईल क्रमांक तसेच बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्यांना शेअरमध्ये चांगला परतावा मिळेल अशा योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी करणच्या सांगण्यावरुन विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक केली होती.
सुमारे ६५ लाख ८० हजाराची गुंतवणुक केल्यानंतर त्यांना गेल्या चार महिन्यांत काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आली होती. तसेच त्यांनी गुंतवणुक केलेल्या शेअरमध्ये चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी आपण गुंतवणुक केल्याचे वाटत होते. मात्र गुंतवणुकीसह परताव्याची रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. बरेच प्रयत्न करुन तसेच करणसह राकेश सिंगशी सतत संपर्क साधूनही त्यांना ही रक्कम मिळाली नव्हती. काही दिवसांनी त्यांनी त्यांना ब्लॉक करुन ग्रुपमधून बाहेर काढले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. शेअरमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून या ठगांनी त्यांना बोगस ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन ६५ लाख ८० हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर करण बत्रा आणि राकेश सिंग नाव सांगणार्या दोन्ही सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवीसह ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.