शेअरमार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक
३२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शेअरमार्केट गुंतवणुकीवर भरघोस चांगला परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी कुबेर ट्रेडिंग कंपनीच्या मालकीणीसह तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भारती सुधाकर पेडणेकर, समर्थ सदये आणि त्रिलोकनाथ गुप्ता अशी या तिघांची नावे आहेत. तक्रारदाराने त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची ३२ लाखांची फसवणुक केल्याचे नमूद केले असले तरी फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद इस्माईल इब्राहिम शेख हे कुर्ला येथे राहत असून एका खाजगी कंपनीत ते कामाला आहेत. मे २०२४ रोजी त्यांना त्यांच्या मित्राने त्याने कुबेर टेंड्रिग कंपनीत पैसे गुंतवणूक केले आहे, त्यात त्याला चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांची ओळख कुबेर ट्रेडिंग कंपनीचे मॅनेजर त्रिलोकनाथ गुप्ताशी करुन दिल होती. घाटकोपर येथे या कंपनीचे एक कार्यालय असून भारती पेडणेकर आणि समर्थ सदये हे कंपनीचे मालक आहेत. ही कंपनीत शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करुन त्यांच्या गुंतवणुकदारांना चांगला परवाता देत असल्याचे त्रिलोकनाथ गुप्ता याने सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनीही या कंपनीच्या माध्यमातून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. मे ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत मोहम्मद इस्माईल यांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांना तीस लाख रुपये दिले होते. ही माहिती नंतर त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनीही या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
अशा प्रकारे त्यांनी एकूण ३२ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना काही महिने परतावा मिळाला होता. मात्र नंतर त्यांना परताव्याची रक्कम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे घाटकोपर येथील कुबेर ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात अनेक गुंतवणूकदार जमा झाले होते. यावेळी या गुंतवणुकदारांना बँकेचा इश्यू असल्याचे सांगून त्यांना त्यांचे पैसे लवकरच मिळतील असे सांगण्यात आले. मात्र पंधरा दिवसांत कोणालाही पैसे मिळाले नाही. २५ ऑगस्टला मोहम्मद इस्माईलसह इतर काही गुंतवणुकदार पुन्हा त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी कार्यालयात तिन्ही आरोपी गैरहजर होते. विचारणा केल्यानंतर कंपनीला साडेतीन कोटीचे पेमेंट येणार असून त्यातून सर्वांचे मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम परत देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र भारती पेडणेकर, समर्थ सदये आणि त्रिलोकनाथ गुप्ता यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. त्यात भारती पेडणेकरने सर्व गुंतवणूकदारांना एक व्हॉईस मॅसेज पाठविला होता. त्यात तिने आमची चुक झाली आहे, आम्ही लोकांचे पैसे देऊ शकत नाही. कंपनीचे पैसे अडकले असून ऑक्टोंबर महिन्यांत लोकांचे पैसे देण्यास सुरुवात करु असे नमूद केले होते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी ऑक्टोंबरपर्यंत वाट पाहिली, मात्र कंपनीने कोणालाही पैसे दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार मोहम्मद इस्माईलने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भारती सुधाकर पेडणेकर, समर्थ सदये आणि त्रिलोकनाथ गुप्ता या तिघांविरुद्घ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात कुबेर ट्रेडिंग कंपनीत अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती, मात्र कोणालाही मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम न देता या तिघांनी संबंधित गुंतवणुकदारांची फसवणुक करुन पलायन केले आहे. त्यामुळे हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.