शेअर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या ३० लाखांचा अपहार

चांगला परतावा देण्याची बतावणी करुन चौघांना गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – शेअर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे ३० लाखांचा अपहार करुन चौघांची त्यांच्याच परिचित आरोपीने फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सार्थक संजय दास या आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सार्थकने तक्रारदार तरुणासह त्याच्या तीन मित्रांना शेअरमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

झील भरत भिमान हा तरुण घाअकोपर येथील ६० फिट रोड, पारस अपार्टमेंटमध्ये राहतो. ईश्‍वर राठोड, प्रणय गोहिल आणि बलेंद्र शर्मा हे त्याचे खास मित्र आहेत. ऑगस्ट महिन्यांत त्याचा परिचित सार्थक दास याने त्याला शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्याला चांगला परतावा देतो असे सांगितले होते. त्यामुळे सार्थकवर विश्‍वास ठेवून त्याच्यासह ईश्‍वर, प्रणय आणि बलेंद्र यांनी त्याच्याकडे ३० लाख ३४ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम त्याच्या वांद्रे येथील के. सी मार्ग, रिसेट जीम, बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये देण्यात आली होती. या चौघांकडून घेतलेले पैसे सार्थकने शेअरमध्ये गुंतवणुक केली नाही. या पैशांचा त्याने वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन या चौघांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पैसे दिले नाही. काही दिवसांनी त्याने त्याचा मोबाईल बंद करुन पलायन केले होते. सार्थककडून फसवणुक झाल्यानंतर झील भिमानसह त्याच्या इतर मित्रांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर सार्थकविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सार्थक हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शेअरमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून सार्थकने अशाच प्रकारे इतर काहींची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page